संगणक शिकविण्यासाठी पालिकेकडे शिक्षक नाहीत
By admin | Published: August 1, 2014 02:52 AM2014-08-01T02:52:11+5:302014-08-01T02:52:11+5:30
पालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाने अनेक उपक्रम हाती घेतले़ शाळांना चांगला निकाल काढण्याचे टार्गेट,
मुंबई : पालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाने अनेक उपक्रम हाती घेतले़ शाळांना चांगला निकाल काढण्याचे टार्गेट, व्हर्च्युअल क्लासरूम, शिक्षकांना प्रशिक्षण, सेमी-इंग्रजीचे वर्ग असे अनेक प्रयोग झाले़ मात्र या हायटेक शिक्षणात संगणक शिकविण्यासाठी पालिकेकडे शिक्षकच उरलेले नाहीत़ त्यामुळे हे सर्व प्रयत्न शिक्षकांविना व्यर्थ चालले आहेत.
पालिकेच्या ११०० शाळांमध्ये सुमारे साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यावर ५३ हजार रुपये खर्च केला जातो, असे एका सर्वेक्षणातून उजेडात आले होते़ विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय वस्तू, विद्यार्थिंनींना प्रोत्साहन भत्ता, खिचडी असे उपक्रम सुरू करण्यात आले़ मात्र हे पुरविताना प्राथमिक सुविधांकडेच दुर्लक्ष करण्यात आले आहे़
पालिकेने प्रत्येक शाळांमध्ये संगणक लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार काही शाळांमध्ये संगणक ठेवण्यात आले़ मात्र संगणक शिकविण्यासाठी तयार केलेल्या शिक्षकांना अन्यत्र व्यस्त करण्यात आल्यामुळे हे वर्ग ओस पडून आहेत़ याबाबत गांभीर्याने विचार सुरू असून लवकरच अशा शिक्षकांची नियुक्ती करून वर्ग सुरू करण्यात येतील, अशी हमी शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद शेलार यांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)