मुंबई - शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे सरकारवर आणि केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधला. केंद्र सरकारच्या ईडी, सीबीआय आणि तत्सम यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईवर बोलताना आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करण्यात येत असून त्यांना तुरुंगात टाकलं जात आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ज्यांना ते घाबरतात, त्यांना तुरुंगात टाकतात, अशी बोचरी टीका आदित्य यांनी केली.
आदित्य ठाकरेंनी मुंबईतील इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये राज्यातील विविध घडामोडींसह देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. तसेच, अनेक प्रश्नांना उत्तरे देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही लक्ष्य केलं. या दरम्यान, आदित्य ठाकरेंची विरोधकांकडून बेबी पेंग्विन म्हणत खिल्ली उडवली जाते, यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी जोरकसपणे उत्तर दिले. आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही पेंग्विन आणल्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेला ५० कोटी मिळाले आहेत. “आम्हाला प्राणीसंग्रहालयात बरेच प्राणी मिळाले. आज किमान ३० हजार लोक प्राणीसंग्रहालयाला भेट देत आहेत. त्यातून, महापालिकेला उत्पन्न सुरू झालं. मात्र, देशात आणलेल्या चित्त्यांचे काय झाले, आधी ते पहा,” असे म्हणत विरोधक भाजपा नेत्यांना आदित्य ठाकरेंनी आरसा दाखवण्याचं काम केलं.
इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचं सेशन एकापाठोपाठ एक होतं. त्याऐवजी, एकत्र सेशन करू. मी एकटा बसतो, त्यांच्या बाजूने येतील तेवढे येऊ द्या, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदेंना दिलं होतं. पण, एकनाथ शिंदे आलेच नाहीत. आदित्य ठाकरे यांचं सेशन संपायला आलं तेव्हा निवेदिकेनं सांगितलं की, एकनाथ शिंदेंना अचानक दिल्लीला जावं लागत असल्याने ते येऊ शकत नाहीत. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी आरोप केला होता की, ते सकाळी उठतच नाहीत आणि त्यांच्यामुळे माझ्या दोन फ्लाईट मिस झाल्या होत्या.
यंत्रणांचा तपास नेहमीच एकतर्फी -
विद्यमान भाजपासमवेतच्या नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे आव्हान आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षाला दिले. “मी रस्त्यावरील फर्निचर घोटाळ्यासह अनेक आरोप लावले आहेत. भ्रष्टाचार उखडून टाकण्यावर ते इतके ठाम असतील तर त्यांची चौकशी का होत नाही? त्यांचा तपास नेहमीच एकतर्फी का होतो? आमचे (तुरुंगात डांबलेले नेते) संजय राऊत, अनिल देशमुख यांच्या सुटकेचे आदेश पहा आणि हे कसे सूडबुद्धीने केले जात आहे ते तुम्हाला दिसेल,” असेही ठाकरे यांनी म्हटले. तसेच, भाजपाने ज्यांच्यावर केवळ भ्रष्टाचाराचा आरोप केला त्या सर्वांचे स्वागत केले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तर, “कर्नाटकमधील तत्कालीन भाजपा सरकार ४० टक्के सरकार असेल तर हे १०० टक्के भ्रष्ट सरकार आहे. हे सरकार बिल्डर आणि कंत्राटदारांच्या संगनमताने आहे,' असा आरोप त्यांनी शिंदे सरकारवर केला.