लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील वाहतूक चौक सुरक्षित करण्यासाठी पालिकेने ‘ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी’ (बीआयजीआरएस) या जागतिक उपक्रमातील भागीदारांच्या सहकार्याने नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. या माध्यमातून मुंबई महानगरातील सर्वाधिक अपघातप्रवण अशा २० वाहतूक चौकांचा नवीन आराखडा तयार करण्यात येणार असून, या आराखड्यानुसार संबंधित चौकांचा कायापालट करण्यात येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत २० अपघातप्रवण क्षेत्रांपैकी १३ क्षेत्रांचा आराखडा तयार झाल्याची माहिती पालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तयार आराखडे मुंबई वाहतूक पोलिसांकडे पाठवण्यात आले असून, त्यात काही बदल असल्यास वाहतूक पोलिस पालिकेला सूचना करणार आहेत, तर उर्वरित अपघातप्रवण क्षेत्रांच्या आराखड्यावर काम सुरू आहे.
शहरातील वाढती वाहनसंख्या आणि अपघात ही गंभीर समस्या बनत असून, मुंबईतील असे २० धोकादायक अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅकस्पॉट) त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. या अपघातप्रवण क्षेत्रात अपघात होऊ नये, याकरिता उपाययोजना आखण्यासाठी पालिकेने आराखडा तयार करण्याचा निर्णय एप्रिल २०२३ मध्ये घेतला होता. त्यानुसार पालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागाकडून या उपक्रमावर काम सुरू आहे. वाहतूक पोलिसांकडून आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन मिळाल्यानंतर आराखड्याद्वारे वाहतूक चौकांमधील अपघात, मृत्यू आणि गंभीर जखमींची संख्या कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे.
कोणत्या उपाययोजना होणार? अपघातप्रवण क्षेत्रातील अपघात, मृत्यू आणि गंभीर दुखापतींची संख्या कमी करणे. पादचाऱ्यांना ओलांडण्यासाठी मार्गिकेचे व पदपथाचे रुंदीकरण करणे. रस्ता ओलांडण्याचे अंतर कमी करण्यासाठी नवीन आश्रयस्थाने निर्माण करणे. वाहतुकीचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी गतिरोधक व पट्ट्या यांच्यासारखे पर्याय.
ब्लॅकस्पॉट म्हणजे काय?रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅकस्पॉट) याचा अर्थ राष्ट्रीय महामार्ग-राज्य महामार्ग-शहरी रस्त्यांवरील ५०० मीटर अंतराचा असा पट्टा की, जेथे मागील सलग तीन वर्षांपासून एकूण पाच गंभीर रस्ते अपघात किंवा अपघातांमुळे मृत्यू किंवा एकूण १० किंवा अधिक मृत्यू झाले आहेत.