अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेने केले हात वर, मनुष्यबळाअभावी कारवाई करण्यास पालिका अधिकारी हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 02:28 AM2018-05-19T02:28:53+5:302018-05-19T02:28:53+5:30
- अजय परचुरे
मुंबई- दादर स्टेशनला लागून असलेल्या क्रांतीसिंह नाना पाटील मंडईला अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा बसला आहे. या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करायला महापालिकेचे अधिकारी तयार नाहीत असंच चित्र सध्या दिसून येतंय. मनुष्यबळाअभावी या अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याचे काम करू शकत नाही असं उत्तर देऊन महापालिकेने सोयिस्कररित्या आपले हात वर केले आहेत. त्यामुळे क्रांतीसिंह नाना पाटील मंडईतील अधिकृत फेरीवाल्यांना भोगावा लागणारा त्रास अजून तसाच सुरू आहे. 'लोकमतने' गुरवारी दादरमधल्या या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात क्रांतीसिंह नाना पाटील मंडईतील व्यापार्यांची व्यथा मांडली होती. मात्र अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याऐवजी मुंबई महापालिका हतबल झाल्याचं चित्र समोर आलं आहे. उच्च न्यायालयाने रेल्वे स्टेशनपासून १५० मीटरच्या अंतरात कोणत्याही फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव केला आहे. असे असतानाही दादर स्टेशनला लागून हे अनधिकृत फेरीवाले दररोज पहाटे ५ ते सकाळी ८ या ३ तासांत राजरोजपणे धंदा करत आहेत. मनसेने फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केल्यानंतर काही दिवस हे फेरीवाले दिसले नाहीत मात्र आंदोलनाची धार कमी होताच हे फेरीवाले पुन्हा अनधिकृतपणे आपला धंदा करत आहेत. याविरोधात कारवाई करण्यासाठी महापालिकेकडे पुरेसे संख्याबळ नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलीय. दादर मंडईचा परिसर हा पालिकेच्या जी नॉर्थ वॉर्डच्या अखत्यारित येतो. मात्र पालिकेचे अधिकारी सकाळी ८ ते ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ यावेळेतच दादर स्टेशन परिसरात कार्यरत असतात. ह्याचाच फायदा घेऊन हे फेरीवाले पहाटे ५ ते सकाळी ८ या तीन तासांत अनधिकृतपणे आपला धंदा करतात. आणि ह्या प्रकारला आळा घालण्यासाठी पालिकेचे अधिकारी आणि पोलिस प्रशासन पूर्णपणे निष्प्रभ ठरले आहे. मुंबई महापालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे दादरच्या क्रांतीसिंह नाना पाटील मंडईतील व्यापार्यांना या अनधिकृत फेरीवाल्यांचा नाहक त्रास कितीवेळ सहन करावा लागणार आहे हाच खरा प्रश्न आहे. या प्रभागाच्या शिवसेनेच्या नगरसेविका प्रिती पाटणकर यांना याविषयी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. चौकट पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत अनधिकृत फेरीवाले दादर स्टेशन परिसरात बसतात ही वस्तुस्थिती आहे. आम्ही जमेल तशी कारवाई करतोय. मात्र पहाटेच्या वेळेत कारवाई करण्यासाठी पालिकेकडे पुरेसा स्टाफ नाहीये. सकाळी ८ वाजल्यापासून रात्रीपर्यंत पालिकेचे कर्मचारी त्या भागात कार्यरत असतात. तेव्हा एकही अनधिकृत फेरीवाला दिसत नाही. सकाळच्या ३ तासांत होणार्या कारवाईसाठी मी स्वत: माननीय आयुक्तांना स्टाफ वाढविण्यासाठी मागणी केली आहे. रीतसर पत्र ही लिहलं आहे. आम्ही लवकरच कारवाई करू अशोेक खैरनार , सहाय्यक आयुक्त,जी नॉर्थ वॉर्ड महापालिकेचे अधिकारी ह्या अनधिकृत फेरीवाल्यांसमोर लाचार झाले आहेत. ह्या अधिकार्यांना त्यांचा मलिदा मिळत असल्याने ह्यांना कोणतीही कारवाई करायची इच्छा नाहीये. मनसेचं शिष्टमंडळ घेऊन मी महापालिका आयुक्तांना याविषयी १२ वेळा भेटलो आहे. त्यांनी स्टाफ नसल्यास कंत्राटी पध्दतीने माणसं वाढवा असे आदेश जी नॉर्थ वॉर्ड ऑफिसरला यापूर्वीच दिलेत. तरीही हे अधिकारी मनुष्यबळाअभावी कारवाई होत नाही असा खोटा दावा करतायत.
संदीप देशपांडे ,प्रवक्ता,महाराष्ट्र नवनिर्माण सेना