नियम मोडणाऱ्या नागरिकांवर पालिकेची करडी नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 05:54 PM2020-09-11T17:54:40+5:302020-09-11T17:55:04+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी के पश्चिम वॉर्डची कडक कारवाई
मनोहर कुंभेजकर
मुंबई : गेल्या ऑगस्टमध्ये शासनाने टाळेबंदी शिथील केल्यानंतर आता नागरिकांची रस्त्यावरची वर्दळ वाढली आहे. बाजारात खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत.त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी के पश्चिम वॉर्डने नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई सुरू केली आहे. तोंडावर मास्क( मुखपट्टी) न लावणारे आणि रस्त्यावर थुंकणारे नागरिक पालिकेच्या रडारवर आहेत. अश्या प्रकारे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार पालिका प्रशासनाने मुंबईतील 24 सहाय्यक आयुक्तांना गेल्या दि,29 जून पासून दिले आहेत.
के पश्चिम वॉर्ड मध्ये विविध ठिकाणी गेल्या तीन दिवसात नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून सुमारे 24000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी लोकमतला दिली.
सुमारे 10 लाख लोकसंख्या असलेल्या के पश्चिम वॉर्ड मध्ये विलेपार्ले पश्चिम,अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी पश्चिम हे तीन मोठे भाग मोडतात. पालिकेने जारी केलेल्या आकडेवारी नुसार 2 सप्टेंबरला के पश्चिम वॉर्डमध्ये 8355 कोरोना रुग्ण होते, तर 9 सप्टेंबरला 9206 कोरोना रुग्ण झाले.या 7 दिवसांच्या कालावधीत या वॉर्डमध्ये 841 कोरोना रुग्णांची वाढ झाली. एकूण आतापर्यंत 9206 कोरोना रुग्णांपैकी 7359 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 343 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आता 1504 कोरोना रुग्णांवर या वॉर्डमध्ये उपचार सुरू आहे. या वॉर्डमध्ये कोरोना रुग्ण दुपटीचा वेग 50 दिवसांवर पोहचला असून सरासरी प्रमाण 1.40 % टक्के इतके आहे.
मुंबईत टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल करण्यात आली आहे. आता रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढत आहे. कोरोनापासून स्वसंरक्षण करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर आणि सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील एक भाग बनायला हवा. नागरिकांनी या बाबींचे स्वत:हून पालन केल्यास यंत्रणांवरचा ताणही कमी होईल असे मत विश्वाास मोटे यांनी शेवटी व्यक्त केले.