महापालिकेने ५ महिन्यांत मारले ५३ हजार उंदीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 01:33 AM2020-06-02T01:33:35+5:302020-06-02T01:33:42+5:30
जानेवारी ते मेपर्यंत ५३ हजार ८९ उंदरांना मारण्यात आले असून पुढेही ही मोहीम राबवली जाणार असल्याचे पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजेंद्र नारिंग्रेकर यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. मात्र सध्या कोरोनाचा फैलाव असल्याने या आजारांना रोखण्याचे आव्हानही मुंबई महापालिकेसमोर आहे. त्यामुळे लेप्टोसारख्या आजारांपासून नागरिकांना दूर ठेवण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाने उंदरांच्या विरोधात मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या पाच महिन्यांत ५३ हजार ८९ उंदीर मारण्यात आले आहेत.
पालिकेच्या कीटकनाशक विभागाने डेंग्यूच्या २ हजार ३५१ ठिकाणी तर ५९२ ठिकाणी मलेरियाच्या अशा एकूण २ हजार ९४३ ठिकाणी सापडलेल्या अळ्या नष्ट केल्या आहेत. पावसाळ्यात लेप्टोचाही प्रादुर्भाव होतो. त्याला रोख लावण्यासाठी उंदरांचाही शोध घेऊन त्यांना मारले जात आहे. कीटकनाशक विभागाने पावसाळ्यात मुंबईत पाणी भरण्याच्या ४३६ ठिकाणांचे सर्वेक्षण केले. पाणी भरण्याच्या या ठिकाणी उंदरांच्या बिळांचा शोध घेतला असता २९ हजार ३२८ उंदरांची बिळे आढळून आली आहेत. कीटकनाशक विभागाने या बिळात उंदीर मारण्याच्या गोळ्या टाकत बिळे मातीने बुजवली. दुसऱ्या दिवशी पाहणी केली असता बहुतांश बिळात उंदीर मेल्याचे आढळले. उंदरांचा पूर्णपणे नायनाट करणे शक्य नाही. परंतु उंदरांचा प्रादुर्भाव रोखणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यामुळे उंदीर असलेल्या बिळात विषारी औषध टाकण्यात येते. या औषधामुळे उंदीर मरतात.
जानेवारी ते मेपर्यंत ५३ हजार ८९ उंदरांना मारण्यात आले असून पुढेही ही मोहीम राबवली जाणार असल्याचे पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजेंद्र नारिंग्रेकर यांनी सांगितले. उंदरांचा शोध घेण्यासाठी कीटकनाशक विभागाच्या माध्यमातून १३७ कामगार जबाबदारी पार पाडतात. तर काही खासगी संस्थांची मदत या कामात घेण्यात येते. परंतु, यंदा कोरोनाचे संकट असून लॉकडाउन असल्याने खासगी संस्थांना काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे गेल्या पाच महिन्यात कीटकनाशक विभागातील कामगार रात्रंदिवस सेवा देत आहेत.