नवी मुंबई : गणेशोत्सवामध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांनी लावलेले अनधिकृत होर्डिंग हटविण्याचे काम नवी मुंबई महापालिकेने युद्धपातळीवर सुरू केले आहे. गेल्या ९ दिवसांमध्ये तब्बल ८९८ होर्डिंग्ज आणि १०८ झेंडे काढण्यात आले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये गणेशोत्सवात सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. शहरातील सर्व महत्त्वाचे चौक, विसर्जन तलाव व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले होते. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. दबावामुळे व गणेशोत्सवामध्ये वाद टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानेही होर्डिंगबाजीकडे थोडेसे दुर्लक्ष केले होते. परंतु आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी शहर होर्डिंगमुक्त करण्याचे आदेश दिल्यानंतर शहरातील सर्वच विभागांमध्ये होर्डिंग हटविण्याची मोहीम राबविली होती. अतिक्रमण विभागाने ४ ते १२ सप्टेंबर दरम्यान शहरातील ८९८ होर्डिंग्ज हटविण्यात आले आहेत. तसेच झेंडेही काढण्यात आले आहेत. शुक्रवारी उशिरापर्यंत होर्डिंग हटविण्याची मोहीम सुरू होती. तर शनिवारी कोणत्याही स्थितीमध्ये शंभर टक्के होर्डिंग हटविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)
पालिकेने उतरविले ८९८ होर्डिंग्ज
By admin | Published: September 13, 2014 1:57 AM