मुंबईमध्ये भूमिगत बाजारासाठी महापालिकेकडून चालढकल, पालकमंत्री दीपक केसरकर यांचा कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 03:46 PM2024-08-28T15:46:56+5:302024-08-28T15:47:18+5:30

अंमलबजावणी न करणाऱ्या मुंबई महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला. 

Municipal Corporation moves for underground market in Mumbai, Parent Minister Deepak Kesarkar warns of action | मुंबईमध्ये भूमिगत बाजारासाठी महापालिकेकडून चालढकल, पालकमंत्री दीपक केसरकर यांचा कारवाईचा इशारा

मुंबईमध्ये भूमिगत बाजारासाठी महापालिकेकडून चालढकल, पालकमंत्री दीपक केसरकर यांचा कारवाईचा इशारा

मुंबई :

दिल्लीतील पालिका बाजारच्या धर्तीवर मुंबईत दोन ठिकाणी भूमिगत बाजार सुरू करण्याची सूचना करूनही त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या मुंबई महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला. 

अरुंद रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा पार्किंग, जागेचा अभाव, फेरीवाल्यांनाही व्यवसायासाठी हक्काची जागा मिळवी, यासाठी नवी दिल्लीच्या धर्तीवर भूमिगत मार्केट संकल्पना राबवण्याचे आदेश केसरकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. मात्र, जवळपास ९ ते १० महिन्यांनंतरही त्यावर पालिका अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी न झाल्याने केसरकर यांनी वरील आदेश दिला आहे. मुंबईत कुठे भूमिगत मार्केट उभारले जाऊ शकते, याची चाचपणी पालिकेने केली. त्यात दादर टीटी व शीव परिसरातील जागेची निवड केली होती.  

युटीलिटीजचा अडथळा 
 भूमिगत मार्केट उभारण्यात रस्त्याखालील युटीलिटीजचा (सेवा वाहिन्यांचा) अडथळा येत आहे. 
 एमटीएनएल, महानगर गॅस, पालिकेच्या पाण्याच्या पाइपलाइन, मलनिस्सारण जलवाहिनी, पर्जन्य जलवाहिनी आदी प्राधिकरणाच्या केबल व पाइपलाइन रस्त्याखाली आहेत. 
 त्यामुळे यांना हानी न पोहोचता भूमिगत मार्केट कसे उभारता येईल, यासाठी पालिकेच्या रस्ते विभागाला अभ्यास करण्याची सूचना पालिकेच्या मार्केट विभागाने केली होती. 

‘अद्याप कोणत्याही हालचाली नाहीत’
अद्याप या दोन जागांवर भूमिगत बाजार सुरू करण्यासाठी कोणतीही हालचाल संबंधित अधिकाऱ्यांनी न केल्यामुळे केसरकर यांनी कारवाईचा इशारा दिला. दर आठवड्याला केसरकर महापालिका मुख्यालयात येऊन आढावा बैठक घेत आहेत.

संकल्पना काय?
 दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे एकमेव भूमिगत पालिका बाजार असून, तो शॉपिंग, नाइटलाइफ आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पालिका बाजारात ३८० दुकाने आहेत. 
 बाजार पूर्णपणे वातानुकूलित 
आहे. या पालिका बाजाराची स्थापना १९७० च्या उत्तरार्धात झाली.
 दिल्लीतील भूमिगत बाजाराचे मुख्य प्रवेशद्वार सेंट्रल पार्कच्या समोर आहे आणि उजव्या बाजूला ‘एफ’ ब्लॉक आहे. एका वेळी १५ हजार लोक सामावू शकतात एवढी या बाजाराची क्षमता आहे. 

Web Title: Municipal Corporation moves for underground market in Mumbai, Parent Minister Deepak Kesarkar warns of action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई