तबेल्यांना महापालिकेची नोटीस
By admin | Published: May 31, 2016 06:13 AM2016-05-31T06:13:45+5:302016-05-31T06:13:45+5:30
शहरातील तबेल्यांचे मलमूत्र नाल्यांमध्ये सोडण्यात येत असल्याने लेप्टोसारखा आजार यंदाच्या पावसाळ्यात बळावण्याचा धोका आहे़
मुंबई : शहरातील तबेल्यांचे मलमूत्र नाल्यांमध्ये सोडण्यात येत असल्याने लेप्टोसारखा आजार यंदाच्या पावसाळ्यात बळावण्याचा धोका आहे़ त्यामुळे पालिकेने सावधगिरी म्हणून तबेला मालकांना नोटिसा बजाविल्या आहेत़ अशा तबेल्यांची पाहणी करून जनावरांच्या मलमूत्राची योग्य विल्हेवाट लावण्यात येत आहे का, याची झाडाझडती पालिका लवकरच घेणार आहे़
मुंबईत असे एकूण १७०० तबेले आहेत़ २६ जुलै २००५मध्ये अशा तबेल्यांमुळेच पश्चिम उपनगर बुडाले होते़ या तबेल्यांतून जनावरांचे मलमूत्र नदी-नाल्यांमध्ये सोडण्यात येते़ यामुळे नाल्यामधील पाणी दूषित होते, तसेच नाले तुंबतात़ गेल्या वर्षी मुंबईत लेप्टोचे रुग्ण वाढल्यानंतर पालिकेने केलेल्या पाहणीत जनावरांच्या मलमूत्रातून हा संसर्ग झाल्याचे दिसून आले होते़
ही बाब ध्यानात ठेवून पालिकेने या वर्षी सर्व तबेल्यांच्या मालकांना नोटीस पाठवून मलमूत्राची विल्हेवाट योग्य प्रकारे लावण्याची सक्त ताकीद दिली आहे़ काही दिवसांनी या तबेल्यांची पाहणी करून त्यांनी पालिकेच्या आदेशाचे पालन केले का, याची खातरजमा करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय़ए़ कुंदन यांच्यातर्फे देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)