अतिवृष्टीनंतर सुस्थितीतील रस्त्यांसाठी महानगरपालिका ‘अलर्ट मोडवर’
By जयंत होवाळ | Published: July 9, 2024 09:27 PM2024-07-09T21:27:34+5:302024-07-09T21:27:44+5:30
खड्डे शोधण्याची-भरण्याची जबाबदारी दुय्यम इंजिनिअर्सवर
मुंबई: सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे काही रस्ते खरवडल्याची तर काही ठिकाणी खड्डे निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २२७ प्रभागातील दुय्यम इंजिनीअर्सनी नेमून दिलेल्या क्षेत्रात दौरे करून खड्डे शोधावेत आणि खड्डे छोट्या आकारांचे असतानाच ते भरावेत. पावसाची उघडीप मिळताच खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेत रस्ते सुस्थितीत ठेवावेत, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी दिले.
सोमवारी मध्यरात्री १ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत ६ तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुंबईकर नागरिकांना रस्ते प्रवासादरम्यान कोणत्याही गैरसोईंना सामोरे जावे लागू नये म्हणून खड्डेमुक्त रस्त्यांचे उदिष्ट ठेवून कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार रस्ते वाहतूक योग्य सुरक्षित स्थितीत आणण्यासाठी तसेच खड्डेमुक्त रस्त्यांसाठी तातडीने उपाययोजना आखण्याबाबत मंगळवारी बांगर यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयात बैठक पार पडली.
२२७ दुय्यम इंजिनिअर्सनी आपापल्या कार्यक्षेत्रात रस्त्यांवर उतरले पाहिजे. दुरूस्तीयोग्य रस्ते (बॅड पॅचेस), खड्डे शोधले पाहिजेत. स्वत:हून खड्डे भरण्याची कार्यवाही पूर्ण केली पाहिजे. रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी महानगरपालिकेने यंत्रणा निर्माण केली आहे. नागरिक, लोकप्रतिनिधी, माध्यमे आणि समाज माध्यमांद्वारे आलेल्या प्रत्येक तक्रारींचा विहीत मुदतीत निपटारा झालाच पाहिजे. विविध विभागांशी समन्वय साधून खड्डे भरण्याची कार्यवाही प्राधान्याने हाती घेतली पाहिजे. रस्ते दुरुस्ती कामामध्ये इंजिनिअरकडून तत्परता दाखवली गेली पाहिजे.रस्त्यांची चाळण झालेली, खड्ड्यात रस्ता अशा बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत. बघ्याची भूमिका न घेता प्रसंगी कारवाई करू,अशी ताकीदही त्यांनी दिली.