मुंबई : ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’च्या नियमांनुसार प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे किंवा अस्तित्वात असलेल्या आरोग्य केंद्रांची संलग्नता घेणे आवश्यक आहे. यानुसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कूपर महापालिका सर्वोपचार रुग्णालयातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा-सुविधांच्या अनुषंगाने प्रशिक्षण मिळावे, याकरिता पालघर जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्रांसोबत संयुक्त कार्यक्रमास नुकतीच सुरुवात झाली आहे.परिणामी, या आरोग्य केंद्रांच्या ग्रामीण परिसरातील नागरिकांना वैद्यकीय तज्ज्ञांची सेवा उपलब्ध होणार आहे. तर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आवश्यक असणारा ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेचा अनुभव घेणे सुलभ होणार आहे, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी दिली.तिन्ही ठिकाणी महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग, स्त्रीरोग व औषधशास्त्र विभागातील डॉक्टर मंडळी गरजेनुसार निर्धारित दिवशी वैद्यकीय सेवा देणार आहेत. त्यामुळे या तिन्ही गावांतील नागरिकांना मुंबईतील डॉक्टरांचे मार्गदर्शन त्यांच्या गावातच उपलब्ध होणार आहे.तसेच आवश्यकतेनुसार येथील रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयातदेखील दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती उपक्रमाचे प्रमुख समन्वयक तथा जनऔषध वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी दिली.१६ विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची सोयसंलग्नता घेण्यात आल्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील जनऔषध वैद्यकशास्त्र विभागातील पदवी, पदव्युत्तर व इंटर्नशिप (आंतरवासिता प्रशिक्षण) करत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पालघर जिल्ह्यातील कामन, केळवे व सातपाटी येथे पाठविले जाणार आहे.या तिन्ही ठिकाणी एका वेळी १६ विद्यार्थ्यांना इंटर्नशिप (आंतरवासिता प्रशिक्षण) करण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच महापालिकेच्या परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची सोयदेखील या ठिकाणी लवकरच करण्यात येणार आहे.
पालिकेची रुग्णालये देणार पालघरमध्ये सेवा; कूपर रुग्णालयाचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 4:04 AM