नववर्षात महापालिकेचा रुग्णांना मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 02:46 AM2020-01-01T02:46:47+5:302020-01-01T02:46:58+5:30
दवाखाने सकाळी ८ वाजता उघडणार; संध्याकाळीही मिळणार उपचार
- शेफाली परब-पंडित
मुंबई : पालिकेचे दवाखाने दुपारी बंद होत असल्याने खासगी उपचार घ्याव्या लागणाऱ्या गरीब रुग्णांना नवीन वर्षात दिलासा मिळणार आहे. सकाळी ९ ऐवजी पालिकेचे दवाखाने आता ८ वाजताच उघडणार आहेत. एवढेच नव्हे, तर सायंकाळी ४ ते रात्री ११ या वेळेतही दवाखाने खुले राहणार आहेत. त्यामुळे कामावरून आल्यानंतरही मुंबईकरांना येथे उपचार घेता येणार आहेत. हातावर पोट असणाºया गरजू रुग्णांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून निवडक १५ दवाखाने संध्याकाळीही खुले राहणार आहेत.
नोकरदारांच्या सुविधेसाठी पालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानंतर दुसºया सत्रात संध्याकाळी ४ ते रात्री ११ या वेळेत दवाखान्यात रुग्णांना उपचार घेता येणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून निवडक १५ दवाखाने संध्याकाळचे सुरू राहणार आहेत. यासाठी मंजुरी घेण्यात आली असल्याने दवाखाने संध्याकाळचे सुरू होतील, असे उपायुक्त सुनील धामणे यांनी सांगितले.
१५ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती
नव्या वेळेत दवाखाने चालवण्यासाठी मे. रुबी अलकेअर सर्व्हिसेस लि. कंपनीला कंत्राट दिले आहे.
दोन वर्षांच्या कामाकरिता वैद्यकीय अधिकाºयांना प्रतिमहा ६० हजार रुपये तर बहुउद्देशीय कामगारांना प्रतिमहा १७,५०० रुपये मानधन मिळणार आहे.
उपरोक्त दवाखान्यांमध्ये दोन वर्षांसाठी १५ वैद्यकीय अधिकारी व १५ बहुउद्देशीय कामगारांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात येईल.
दोन वर्षांचा एकूण खर्च दोन कोटी ७९ लाख रुपये इतका करण्यात येणार आहे.
हे आहेत ते दवाखाने
ए विभाग - कुलाबा म्युनि. दवाखाना
बी विभाग - वालपाखाडी दवाखाना
डी विभाग - बाने कंपाउंड दवाखाना
ई विभाग - साऊटर स्ट्रीट दवाखाना
एफ/नॉर्थ - रावळी कॅम्प, वडाळा दवाखाना
जी/साऊथ - बीडीडी चाळ दवाखाना
एच/ईस्ट - कलिना दवाखाना
एच/वेस्ट - ओल्ड खार दवाखाना
के/वेस्ट - एन. जे. वाडिया दवाखाना
पी/नॉर्थ - चौक्सी दवाखाना
आर सेंट्रल - गोराई म्हाडा दवाखाना
एल विभाग - चुनाभट्टी दवाखाना
एन विभाग - रमाबाई आंबेडकर दवाखाना
एस विभाग- कांजूर व्हिलेज दवाखाना