मुंबई : कोविड काळात लोकल सेवा बंद असताना बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. मात्र या काळात काही बस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यापैकी शंभर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यासाठी पालिकेने बेस्ट उपक्रमाला ५० कोटी रुपये अर्थसाहाय्य केले.बेस्टमध्ये कर्तव्य निभावताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांची मदत करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. त्यानुसार आपल्या कर्मचाऱ्यांना पालिकेने आर्थिक मदत केली. मात्र बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असल्याने मृत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत मिळण्यास विलंब होत होता. कोविड काळात मृत्युमुखी पडलेल्या अशा शंभर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख देण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांनी २७ जानेवारी २०२१ रोजी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठविले होते.
प्रत्येक कुटुंबाला मिळणार ५० लाख रुपयेबेस्ट प्रशासनाने ५० कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी पालिकेकडे केली होती. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या या मागणीचा विचार करून सुधारित अर्थसंकल्पात तरतूद करून ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ही रक्कम ५ फेब्रुवारी २०२१ रोजी देण्यात आली. आयुक्तांनी ३ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडताना कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबाला ५० लाख रुपये एवढे अर्थसाहाय्य देण्यात येईल, असे जाहीर केले.