महापरिनिर्वाण दिनासाठी महापालिका सज्ज!; समन्वय साधून सर्व यंत्रणांना सेवा पुरविण्याचे दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 03:06 AM2018-11-19T03:06:47+5:302018-11-19T03:07:03+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई पालिकेने यंदाही अनुयायांना उत्तमोत्तम नागरी सुविधा पुरविण्यावर भर दिला आहे.
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई पालिकेने यंदाही अनुयायांना उत्तमोत्तम नागरी सुविधा पुरविण्यावर भर दिला आहे. दादर येथील चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधांबाबत प्रशासन सतर्क व सुसज्ज असल्याचे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त अजय मेहता यांनी केले. तसेच सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय साधून योग्य सेवा पुरविण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.
अजय मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका मुख्यालयात महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख, पोलीस प्रशासन, बेस्ट, आपत्ती व्यवस्थापन, मुंबई अग्निशमन दल तसेच विविध सामाजिक संघटना यांच्या पदाधिकाºयांची बैठक आयोजित करण्यात आली होती, या वेळी मेहता आढावा बैठकीत बोलत होते. ते म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही चैत्यभूमी येथे येणाºया अनुयायांकरिता उत्तमोत्तम नागरी सेवा-सुविधा पालिकेतर्फे पुरविल्या जाणार आहेत. शिवाजी पार्क परिसरात स्वच्छतेच्या अनुषंगाने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरती शौचालये, चैत्यभूमी येथे दर्शनासाठी उभ्या असणाºया अनुयायांसाठी उन्हापासून संरक्षणासाठी छत, पाण्याची व्यवस्था, संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था, बसण्यासाठी बाकडे याही सुविधा पुरविण्याबाबत प्रशासनातर्फे तयारी सुरू आहे.
विशेष सुरक्षा व्यवस्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ लाख २५ हजार चौरस फूट मंडपाची व्यवस्था, भन्तेजी यांच्यासाठी भारत स्काऊटचे गाइड येथे निवासाची व्यवस्था, शिवाजी पार्क, दादर स्थानक, चैत्यभूमी परिसरात माहिती कक्ष/निरीक्षण मनोरे, २ ड्रोन कॅमेरे, ११ रुग्णवाहिकांसहित सुसज्ज आरोग्य सेवा, अनुयायांसाठी ६० क्लोज सर्किट टीव्ही, फिरते कॅमेरे, दूरचित्रवाहिनी, ४४ मेटल डिटेक्टर, १० बॅग स्कॅनर्स, ६० हॅण्डहेल्ड मेटल डिटेक्टर, विद्युत व्यवस्था (३५० ट्युबलाइट्स, २३० हॅलोजन, ५० पेडेस्टंट फॅन), १०० डिलक्स व ३५० प्लॅस्टिक खुर्च्या, लाकडी मेज (टेबल), ध्वनिक्षेपण व्यवस्था, ३०० चार्जिंग पॉइंट्स, २८० फिरती शौचालये, २६० स्नानगृहे, ४ अग्निशमन इंजीन, अतिदक्षता रुग्णवाहिका, ४ बोटी व ४८ जीवरक्षक, शिवाजी पार्क येथे ५१९ स्टॉल्सची रचना, पिण्याच्या पाण्याच्या ३८० नळांची व्यवस्था, १६ टँकर्स, चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरात फ्लेक्स बॅनर्स, होर्डिंग्ज व दिशादर्शक फलक, १४ हजार चौ.मी.वर धूळप्रतिबंधक आच्छादक, २६० न्हाणीघरांमध्ये शॉवरची व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीत १० हजार अनुयायांसाठी महापालिका शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था, बसण्यासाठी ६० बाकडे या सुविधांचा प्रामुख्याने यामध्ये समावेश आहे.
२६४ कर्मचा-यांची नेमणूक
स्वच्छतेच्या अनुषंगाने २६४ कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली असून, हे कर्मचारी चार पाळ्यांमध्ये काम पाहतील.
कर्मचाºयांवर ताण पडू नये यासाठी सफाई कर्मचाºयांची कामाची वेळ आठ तासांवरून सहा तास करण्यात आली आहे.
समुद्रकिनारी बोटी तैनात ठेवणे, चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरासोबत राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा या ठिकाणीही आवश्यक त्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
रांगेतील अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कुपरेज मैदान येथे शौचालयांची व्यवस्था, अनुयायी ज्या-ज्या स्टेशनवर उतरतात, त्या ठिकाणी सकृतदर्शनी मोठे दिशादर्शक फलक तसेच चैत्यभूमीवर जाणाºया बस क्रमांकासह नोंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले.