Join us

मान्सूनसाठी महापालिका सज्ज, पालिकेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 2:26 AM

पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास पालिका प्रशासन सज्ज आहे, असा दावा मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात गुरुवारी केला.

मुंबई : पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास पालिका प्रशासन सज्ज आहे, असा दावा मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात गुरुवारी केला. पावसामुळे लोक शहरात अडकले तर त्यांच्यासाठी जेवणाची व वैद्यकीय मदतीची सोय करण्यात आली आहे, असे महापालिकेने उच्च न्यायालयाला सांगितले.गेल्यावर्षी २९ आॅगस्ट रोजीच्या मुसळधार पावसात लोअर परळ येथील एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईत पुन्हा असे प्रसंग उद्भवू नयेत, यासाठी फेडरेशन आॅफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती.गुरुवारच्या सुनावणीत महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी शहरातील १,४२५ मॅनहोल्सना संरक्षक जाळ्या बसविल्याची माहिती न्यायालयाला दिली. मॅनहोलचे वरचे झाकण जरी काढण्यात आले तरी संरक्षक जाळ्यांमुळे कोणाचा मृत्यू होणार नाही. नागरिकांनी मॅनहोल उघडे दिसले तर संबंधित प्रभाग अधिकाऱ्याला याची माहिती द्यावी, असे आवाहनही पालिकेतर्फे साखरे यांनी नागरिकांना केले.पावसाळ्यात मुंबईची ‘तुंबापुरी’ होऊ नये, यासाठी शहरात ज्या ठिकाणी पाणी साचते, त्या ठिकाणी सक्शन पंप बसविण्यात आले आहेत. त्याशिवाय महापालिकेने आपत्कालीन व्यवस्थापन अ‍ॅप तयार केले असून, या अ‍ॅपवरून पावसाळ्यात अडकलेल्या नागरिकांना रेस्टॉरंट, निवास व वैद्यकीय सेवेबाबत माहिती देण्यात येईल. तसेच त्यांना हवामान व भरतीचा अंदाजही देण्यात येईल, असे साखरे यांनी न्यायालयाला सांगितले.त्यावर न्यायालयाने महापालिकेला २९ आॅगस्ट रोजी उच्च न्यायालयाच्या इमारतीत अडकलेल्या कर्मचाºयांची व पक्षकारांची आठवण करून दिली. ‘२९ आॅगस्ट रोजी येथे (उच्च न्यायालयाची इमारत) अनेक जण अडकले. आम्हाला त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची सोय करावी लागली. काही वकील मदतीला धावून आले. मात्र, महापालिकेने काही शब्दही काढला नाही. ट्रेन बंद पडल्या होत्या. रस्ते बंद होते. त्यामुळे कर्मचारी व पक्षकारांना न्यायालयात थांबावे लागले. महापालिकेने का काही केले नाही? कोणालातरी सांगून येथील लोकांची स्थिती पाहण्याचे महापालिकेचे कर्तव्य नाही?’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने महापालिकेला फैलावर घेतले. ‘अशा प्रकारची दुर्घटना (डॉ. अमरापूरकर यांचा मृत्यू) पुन्हा घडू नये, हीच आमची मुख्य काळजी आहे,’ असे म्हणत न्यायालयाने मॅनहोल्सवरील झाकण हरविल्यास, पाणी तुंबल्यास व अन्य काही गोष्टींना संबंधित प्रभाग अधिकाºयालाच जबाबदार ठरविण्याची सूचना केली.>शहरात बसवणार सक्शन पंपपावसाळ्यात मुंबईची ‘तुंबापुरी’ होऊ नये, यासाठी शहरात ज्या ठिकाणी पाणी साचते, त्या ठिकाणी सक्शन पंप बसविण्यात आले आहेत. त्याशिवाय महापालिकेने आपत्कालीन व्यवस्थापन अ‍ॅप तयार केले असून, या अ‍ॅपवरून पावसाळ्यात अडकलेल्या नागरिकांना निवास व वैद्यकीय सेवेबाबत माहिती देण्यात येईल.