कब्रस्तानासाठी जागा राखीव ठेवण्यास महापालिका तयार
By admin | Published: April 26, 2017 12:42 AM2017-04-26T00:42:24+5:302017-04-26T00:42:24+5:30
वांद्रे येथील एसपीए ब्लॉक-ए मध्ये ३ हजार चौ. मी. जागा सुन्नी मुस्लिमांच्या कब्रस्तानासाठी राखीव ठेवण्याची तयारी मुंबई महापालिकेने दर्शवली आहे.
मुंबई : वांद्रे येथील एसपीए ब्लॉक-ए मध्ये ३ हजार चौ. मी. जागा सुन्नी मुस्लिमांच्या कब्रस्तानासाठी राखीव ठेवण्याची तयारी मुंबई महापालिकेने दर्शवली आहे. मात्र, ११७ एकर असलेल्या एसपीए ब्लॉक - ए च्या नक्की कोणत्या भागात कब्रस्तानासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे, हे महापालिकेने स्पष्ट न केल्याने, उच्च न्यायालयाने राखीव भूखंडाचा नकाशा काढून त्याचे ठिकाण इत्यादीची तपशिलात माहिती देण्याचे निर्देश दिले.
वांद्रे व खार परिसरात सुन्नी मुस्लिमांसाठी दफनभूमी बांधण्यासाठी प्रस्तावित विकास आराखड्यात भूखंड राखीव ठेवावा, यासाठी मोहम्मद अली कुरेशी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने प्रस्तावित विकास आराखड्यात दफनभूमिसाठी जागा राखीव ठेवणार की नाही, अशी विचारणा करत, महापालिकेला प्रतिज्ञापत्राद्वारे तशी हमी देण्याचे निर्देश दिले होते. पुढील सुनावणीत महपालिकेने संबंधित जागेचा नकाशा सादर करावा आणि ठिकाणाचीही माहिती द्यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. (प्रतिनिधी)