Join us

माजी नगरसेवकांचे पालकत्व घेण्याचे महापालिकेला साकडे; महासभेत होणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 3:28 AM

, नगरसेवक आपला संपूर्ण वेळ जनतेच्या सेवेसाठी खर्ची घालतात.

मुंबई : नगराची सेवा करण्यासाठी नेमलेल्या नगरसेवकांकडून आणखी एक मागणी पुढे आली आहे. विविध आजारांनी ग्रस्त, वृद्धापकाळात एकाकी जीवन जगणाऱ्या माजी नगरसेवकांचे पालकत्व स्वीकारण्याचे साकडे महापालिकेला घातले आहे. ही ठरावाची सूचना पालिका महासभेत लवकरच मंजुरीसाठी येणार आहे.

नगरसेवकांना जनतेच्या मदतीसाठी तत्पर राहावे लागते, पण या लोकसेवेचे मोल मिळण्यासाठी नगरसेवकांकडून आतापर्यंत अनेक मागण्या होत आल्या आहेत. नगरसेविका सोनम जामसूतकर यांनी माजी नगरसेवकांचे पालनपोषण व वैद्यकीय उपचाराचा खर्च करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. अशा प्रकारच्या अनेक मागण्या यापूर्वी नगरसेवकांकडून करण्यात आल्या आहेत.

मात्र, नगरसेवक आपला संपूर्ण वेळ जनतेच्या सेवेसाठी खर्ची घालतात. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे व स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे उतारवयात त्यांना एकाकी जीवन जगावे लागते. अशा नगरसेवकांना पालिकेने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी नगरसेविका सोनम जामसूतकर यांनी पालिका महासभेपुढे केली आहे. महासभेच्या मंजुरीनंतर हा ठराव आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येणार आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई पोर्ट ट्रस्ट, माझगाव डॉक आणि विविध सरकारी प्राधिकरणांच्या अखत्यारितील रस्त्यांवरून मोफत वाहन नेण्याची सवलत नगरसेवकांना निवृत्ती वेतन, विमा योजनेचा लाभ, जलतरण तलावाचे मोफत सदस्यत्व, कार्यालयासाठी, तसेच घरासाठी भूखंड, मुंबईतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार, वांद्रे-वरळी समुद्रसेतूवरून मोफत प्रवास अशा मागण्या यापूर्वी करण्यात आल्या आहेत.नगरसेवकांना दरमहा २५ हजार रुपये मानधन, प्रत्येक महासभा व अन्य समित्यांच्या बैठकीसाठी भत्ता, फोनचे बिल, लेपटॉप, बेस्ट बसचा मोफत प्रवास आदी सुविधा मिळतात.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबईमहाराष्ट्र