मुंबई- कोविड प्रतिबंधक लसींचा साठा संपुष्टात आल्यामुळे मागील दोन दिवस शासकीय आणि पालिका केंद्रांमध्ये लसीकरण बंद होते. मात्र गुरुवारी रात्री मुंबईला एक लाख ६० हजार २४० लसींचा साठा प्राप्त झाला आहे. या लसींचे वितरण सर्व सरकारी केंद्रांत करण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारपासून मुंबईतील लसीकरण मोहीम पूर्ववत होणार आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ९० लाख लाभार्थ्यांपैकी ८२ लाख ४३ हजार ७८९ नागरिकांना लस मिळाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत मुंबईतील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले आहे.
दरम्यान, लसींचा साठा संपुष्टात आल्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस शासकीय व महापालिका केंद्रावरील लसीकरण बंद ठेवण्याची वेळ पालिकेवर आली होती. मात्र गुरुवारी रात्री महापालिकेला मिळालेल्या लस साठ्यामध्ये कोविशिल्डचे एक लाख ५० हजार तर कोवॅक्सिनचे दहा हजार २४० डोस आहेत.
मुंबईतील लसीकरण -- मुंबईतील एकूण लाभार्थी - ९० लाख- आतापासून लस घेतलेले - ८२ लाख ४३ हजार ७८९- पहिला डोस घेतलेले - ६१ लाख ५९ हजार ८९६ - दोन्ही डोस घेतलेले - २० लाख ८३ हजार ८९३- आरोग्य सेवक, फ्रन्टलाइन वर्कर्स - ७२७७१५ - ज्येष्ठ नागरिक - १७२१६४७ - ४५ ते ५९ वर्षे - २४७३५२६ - १८ ते ४४ वर्षे - ३२८४८७७ - गर्भवती महिला - ६७४- कोविशिल्ड - ७६१४४८५ - कोव्हॅक्सिन - ६०४४७४ - स्पुतनिक - २४८३०