पालिकेचा हात, माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यानाचा पुनर्विकास, ३ कोटी खर्चून खेळाडूंसाठी विनाशुल्क सुविधा  

By सीमा महांगडे | Published: December 9, 2023 10:56 PM2023-12-09T22:56:17+5:302023-12-09T22:57:28+5:30

हे मैदान लहान मुलांपासून ते ज्येष्ठांसाठी वापरण्यात येईल अशा सोयी सुविधा यात असतील मात्र उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना मोफत सराव करता यावा, त्यातून चांगल्या संधी मिळाव्यात हा उद्देश असणार आहे.

Municipal corporation redevelopment of Maasaheb Meenatai Thackeray Udyan free facility for sportsmen at a cost of 3 crores | पालिकेचा हात, माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यानाचा पुनर्विकास, ३ कोटी खर्चून खेळाडूंसाठी विनाशुल्क सुविधा  

पालिकेचा हात, माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यानाचा पुनर्विकास, ३ कोटी खर्चून खेळाडूंसाठी विनाशुल्क सुविधा  

बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो-खो अशा मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या गार्डन (उद्यान कक्ष) सेलने पुढाकार घेतला आहे. पवई चांदिवली येथील मीनाताई ठाकरे मैदानाचा कायापालट होणार असून या उद्यानात बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो अशा मैदानी खेळांची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून तब्बल साडेतीन कोटींची निविदा प्रक्रिया काढण्यात आली असून निविदा निश्चिती झाल्यानंतरच्या पुढील ६ ते ७ महिन्यात हे मैदान नागरिकांसाठी खुले करण्याचा उद्यान कक्षाचा मानस आहे. हे मैदान लहान मुलांपासून ते ज्येष्ठांसाठी वापरण्यात येईल अशा सोयी सुविधा यात असतील मात्र उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना मोफत सराव करता यावा, त्यातून चांगल्या संधी मिळाव्यात हा उद्देश असणार आहे.

मुंबईत १०६८ उद्याने आणि मैदाने असून त्यांची देखभाल, दुरुस्ती आणि अद्ययावतीकरणासाठी पालिकेने मागील अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांची वाढती संख्या आणि सततच्या वापराने या उद्यान, मैदानांना देखभाल, नवीन सुविधांचा समावेश करण्याची गरज भासते. त्यामुळ प्रत्येक काही वर्षाने टप्प्याटप्प्याने उद्याने, मैदानांची डागडुजी केली जाते. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या विविध भागातील उद्यान, मैदानांची दुरुस्ती करण्यात येत आहे.

चांदिवलीतील माँसाहेब मीनाताई ठाकरे मनोरंजन मैदानाची उभारणी ६ वर्षांपूर्वी करण्यात आली. मात्र आता त्याची दुरावस्था झाली आहे. या कारणास्तव मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिक व मुलांना खेळण्यास्तही चांगले मैदान उपलब्ध नसल्याने या मैदानाच्या पुनर्विकासाचा अर्ज स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला होता. दरम्यान पालिकेच्या उद्यान कक्षाकडून यासाठी पुढाकार घेण्यात आला असून अत्याधुनिक क्रीडा सुविधांनी युक्त असे मैदान उपलब्ध करून या मैदानाचे रुपडे पालटण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. मैदानांत खेळाचे व व्यायामाचे जुने साहित्य बदलून अत्याधुनिक नवे साहित्य बसवण्यात येईल. आवश्यक तिथे मातीचा थर वाढवणे, सुरक्षा भिंती असे विविध बदल करण्यात येणार आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर माँसाहेब मीनाताई ठाकरे मनोरंजन मैदानाचा पुनर्विकास करण्याचे पालिकेने ठरवले आहे. यासाठी इच्छुक निविदाकार येत्या १६ तारखेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

मैदानातील सुविधांसाठी शुल्क नाही
महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या मैदानातील क्रीडा सुविधांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या खेळ साहित्याचा वापर करून, मैदानाचा वापर करून उदयोन्मुख खेळाडूंना विनाखर्च सराव करता येणार आहे. अनेक ठिकाणी शुल्क आकारून त्यांना सराव करावा लागत असल्याने ते आपल्या प्रतिभेपासून दुरावतात, त्यामुळे या पालिकेच्या मैदानात सर्व प्रकारच्या सुविधा तयन मोफत उपलब्ध होणार आहेत.  
 

Web Title: Municipal corporation redevelopment of Maasaheb Meenatai Thackeray Udyan free facility for sportsmen at a cost of 3 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.