Join us

भूखंड परत करण्याची महापालिकेवर नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 5:26 AM

मुंबई : उच्च न्यायालयात महापालिकेच्या विरोधात निकाल गेल्यामुळे, भांडुप पश्चिम नाहूर गाव येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची जागा विकासकाला परत करण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढावली आहे.

मुंबई : उच्च न्यायालयात महापालिकेच्या विरोधात निकाल गेल्यामुळे, भांडुप पश्चिम नाहूर गाव येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची जागा विकासकाला परत करण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढावली आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या भूखंडावर पाणी सोडण्याऐवजी, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची सूचना सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली होती. मात्र, हा भूखंड देण्यासाठी महापालिकेच्या सुधार समितीसह कोणत्याही समितीच्या मंजुरीची आवश्यकता नसल्याने, हा भूखंड प्रशासनाने या आधीच विकासकाला देऊन टाकला आहे.भांडुपमधील १८ हजार ७६५ चौरस मीटरची आरक्षित जागा विकासक रुणवाल होम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने महापालिकेला हस्तांतरित केली. हा भूखंड हस्तांतरित करताना, यावरील विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) विकासकाने वापरला. त्यामुळे या भूखंडावर सुपरस्पेशालिटी रुग्णालय बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, या आरक्षित भूखंडापैकी रस्त्याने बाधित होणारी ८ हजार २०९ चौरस मीटरच्या जागेवर विकासकाने दावा केला. मात्र, सुधार समितीने हा प्रस्ताव फेटाळल्यामुळे संबंधित विकासकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणात महापालिकेची बाजू कमकुवत पडल्याने, ही जागा विकासकाला परत देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार, ही जागा विकासकाला परत देण्यासंदर्भात सुधार समितीपुढे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.मात्र, हा प्रस्ताव फेटाळून लावत या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची सूचना सदस्यांनी केली होती. न्यायालयाने २ आठवड्यांमध्ये कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. हा भूखंड विकासकाला परत करण्यासाठी सुधार समिती किंवा महापालिकेच्या परवानगीची आवश्यकता नाही, असा अभिप्राय वरिष्ठ विधितज्ज्ञ भरूचा यांनी दिला होता. त्यानुसार, हा भूखंड प्रशासनाने २८ सप्टेंबर २०१७ रोजी विकासकाला परत केला.>भांडुपमधील उर्वरित भूखंडावर पालिका उभारणार रुग्णालयउर्वरित १० हजार ५५६ चौरस मीटरच्या भूखंडावर नियोजित सुपर स्पेशालिटी रुग्णालय महापालिका आता बांधणार आहे. यासाठी वास्तुविशारद शशी प्रभू आणि असोसिएट्स यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.३६९ खाटांचे रुग्णालय बांधण्यात येणार असून, त्यामध्ये गॅस्ट्रो इंटरोलॉजी विभाग आणि गॅस्ट्रो सर्जरी, कार्डिओलॉजी विभाग, कार्डिओलॉजी सर्जरी विभाग, न्युरोलॉजी आणि न्युरोसर्जरी विभाग, युरोलॉजी आणि युरोसर्जरी असे विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकान्यायालय