मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महापालिकेने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन सोहळ्यात दहापेक्षा अधिक व्यक्तींना सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दहाही व्यक्तींचे दोन डोस पूर्ण होऊन १४ दिवस उलटलेले असावे. तसेच, कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यात येऊ नये, अशी स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे.
मुखदर्शनास मनाई
महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत भाविकांना प्रत्यक्षदर्शन व मुखदर्शन घेण्यास सक्त मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सव मंडळांनी भाविकांसाठी ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबूक, समाज माध्यमे इत्यादींद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे या वेळी सांगण्यात आले.
असे आहेत नियम
* घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतोवर घरच्या घरी बादलीत किंवा ड्रममध्ये करावे. घरच्या घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यास प्राधान्य द्यावे.
* संपूर्ण चाळ, इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्रितरीत्या नेऊ नयेत. आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीतकमी वेळ थांबावे. विसर्जनादरम्यान वाहन थांबवून रस्त्यांवर भाविकांना गणेशमूर्तीचे दर्शन घेऊ देण्यास सक्त मनाई आहे.
* एकूण ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळी मूर्ती संकलनाची शिस्तबद्ध व्यवस्था पालिकेने उपलब्ध केली आहे. त्यांच्याकडे गणेशमूर्ती देण्यात यावी. नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांनी किंवा मंडळांच्या कार्यकर्त्यांनी थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध आहे.
* १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. अशा तलावांलगत राहणाऱ्या भाविकांनी शक्यतोवर कृत्रिम तलावांचा वापर करावा.
* विसर्जनादरम्यान अंतर ठेवणे, मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
* प्रतिबंधित क्षेत्रात असणाऱ्या गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावे. सील इमारतींमधील गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी घरीच व्यवस्था करावी.