पावसाळ्यापूर्वी ९५ रस्त्यांची कामे उरकण्यासाठी पालिकेची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 12:14 AM2020-04-26T00:14:33+5:302020-04-26T00:18:23+5:30
जास्तीत जास्त कामे यांत्रिक पद्धतीने करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याप्रमाणे नालेसफाई पाठोपाठ आता मुंबईतील रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत़
मुंबई : कोरोनामुळे मान्सूनपूर्व कामांना विलंब होत असल्याने त्याचा फटका यंदा पावसाळ्यात बसण्याचा धोका आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कामे यांत्रिक पद्धतीने करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याप्रमाणे नालेसफाई पाठोपाठ आता मुंबईतील रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत़
२०७पैकी ९५ रस्त्यांची कामे ेपावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तर मनुष्यबळ लावताना सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी घेण्याची ताकीद आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईत मान्सूनपूर्व कामांना सुरुवात होते. मात्र मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. यामुळे पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाºया कामांचे नियोजन होऊ शकले नाही. आणखी विलंब पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी करू शकतो, या भीतीने यांत्रिकी पद्धतीने कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
बाधित क्षेत्रांमध्ये नालेसफाई, रस्त्यांची कामे याबाबत तूर्तास निर्णय घेण्यात आलेला नाही. ही कामे करताना सर्व प्रतिबंधात्मक काळजी घेण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार कामाच्या ठिकाणी कामगार, अधिकाºयांना मास्कचा
वापर नियमितपणे करण्यास बजाविण्यात आले आहे. यापूर्वी सुरू असलेल्या
रस्त्यांच्या कामांसह नव्याने
हाती घेतलेल्या कामांपैकी एकूण २७९ रस्त्यांची कामे ही पावसाळ्यापूर्वी
पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले
आहे.
पावसाळ्यादरम्यान वाहतुकीसाठी या रस्त्यांचा वापर करता
येईल, अशा टप्प्यापर्यंत रस्त्यांचे काम केले जाणार आहे. तर पावसाळ्यानंतर
रस्त्यांची उर्वरित कामे होणार आहेत.
>महत्वाच्या रस्त्यांवर लक्ष केंद्रीत
मुंबईत सध्या एकूण २०७ ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामध्ये ३५ कामे शहर भागातील असून ४६ कामे ही पूर्व उपनगरांमधील आहेत. तर पश्चिम उपनगरांमधील १२६ कामे सुरू आहेत.
या कामांमध्ये अंधेरी, घाटकोपर लिंंक रोड, 'जी दक्षिण' विभागातील शंकरराव नरम मार्ग, घाटकोपर-मानखुर्द लिंंक रोड, वांद्रे पूर्व परिसरातील हरिमंदिर मार्ग या रस्त्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
रस्त्यांच्या २०७ कामांपैकी ९५ कामे ही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत. यामध्ये शहर भागातील ३३, पूर्व उपनगर २४ आणि पश्चिम उपनगरातील ३८ कामांचा समावेश आहे.