Join us

महापालिका उभारणार सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:18 AM

सल्लागारांवर ५५ कोटींचा खर्चलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतल्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट समुद्रात सोडले जात ...

सल्लागारांवर ५५ कोटींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतल्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट समुद्रात सोडले जात असल्याची टीका झाल्यानंतर, तसेच यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कान टोचल्यानंतर आता मुंबई महापालिका मालाड येथे सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र उभारणार आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाईल.

मालाड येथील सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्राच्या सल्लागारांवर ५५ कोटी २५ लाख ९७ हजार ५०० रुपये खर्च केले जाणार आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट समुद्रात सोडल्यामुळे सागरी पर्यावरण धोक्यात येते. जैवविविधतेची हानी होते. त्यामुळे यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्बंध घातले आहेत. त्यानुसार, मुंबई महापालिकेच्या स्तरावर सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार असून यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव सादर होणार आहे.

दरम्यान, महापालिकेच्या मल:निस्सारण विभागाच्या वतीने जोहूकासू सांडपाणी प्रक्रिया सयंत्र नुकतेच भांडुप संकुल येथे बसविण्यात आले. जपानी तंत्रज्ञानावर आधारित सयंत्रामुळे प्रतिदिन १० हजार लीटर पाणी स्वच्छ होऊन पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी या पाण्याचा वापर शक्य होईल. महापालिका उद्यानांव्यतिरिक्त वाहने धुणे, शौचालयाच्या वापरासाठी या पाण्याचा उपयोग करता येणार आहे.

-------------------

मुंबईला दररोज ३ हजार ८०० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो.

२ हजार ७०० दशलक्ष लीटर पाणी सांडपाण्याच्या रूपात समुद्रात जाते.

-------------------

मुंबई महापालिका सात ठिकाणी अशी केंद्रे उभारत आहे.

कुलाबा, वरळी, धारावी, वांद्रे येथे केंद्र उभारली आहेत.

-------------------

वर्सोवा, घाटकोपरसाठी सल्लागार नेमले आहेत.

आता मालाडसाठी काम केले जात आहे.

-------------------