Join us

धारावीत पालिका घेणार खासगी दवाखान्यांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 12:57 AM

 पालिकेच्या जी उत्तर विभागामार्फत येथे मिशन धारावी आणि फिव्हर कॅम्पच्या माध्यमातून बाधित क्षेत्रातील लोकांची तपासणी केली जात आहे. यापैकी संशयितांना तत्काळ वेगळ्या ठिकाणी ठेवले जात आहे.

मुंबई : धारावी परिसरात सोमवारी कोरोना बाधित १३ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे येथील रुग्णांची संख्या आता २८८ वर पोहचली आहे. तर १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पालिकेने या विभागातील खाजगी दवाखान्यांची मदत घेतली आहे. येथील साडेतीनशे दवाखान्यांना स्व संरक्षण किट देऊन संशयित रुग्णांची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे.धारावी परिसरात कोरोनाचा संसर्ग रोखणे एक आव्हान ठरले आहे. येथून दररोज सरासरी २० ते ३० नवीन बाधित रुग्ण सापडत आहेत. रविवारी ३४ नवीन रुग्ण आढळले होते, तर सोमवारी १३ रुग्ण सापडले आहेत. पालिकेच्या जी उत्तर विभागामार्फत येथे मिशन धारावी आणि फिव्हर कॅम्पच्या माध्यमातून बाधित क्षेत्रातील लोकांची तपासणी केली जात आहे. यापैकी संशयितांना तत्काळ वेगळ्या ठिकाणी ठेवले जात आहे. मात्र केंद्राच्या विशेष पथकाने गेल्या आठवड्यात या ठिकाणी पाहणी करून जास्तीत जास्त लोकांची चाचणी करण्याची सूचना पालिकेला केली आहे.त्यानुसार येथील खाजगी दवाखान्यांना त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला तपासून संशयित रुग्णाला पालिका रुग्णालयात पाठविण्यात सूचना केली आहे.यापैकी कोरोनाची लक्षणे असलेल्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. पालिकेच्या पथकामार्फत येथे बाधित क्षेत्रातील नागरिकांची तपासणी सुरू आहे. खाजगी दवाखान्याची मदत मिळाल्यास संपूर्ण धारावीतील नागरिकांपर्यंत पोहोचून संशयित रुग्णांना शोधणे शक्य होईल, असा विश्वास महापालिकेचे अधिकारी व्यक्त करीत आहेत.यासाठी साडेतीनशे खाजगी दवखान्याना स्व संरक्षण किट देऊन त्यांच्या दवाखान्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. तसेच विभागात स्वच्छतेचे धडे दिले जाणार आहेत़दादर, माहिममध्ये नवीन रूग्ण नाहीदादर आणि माहीम भागात गेल्या तीन दिवसांमध्ये एकही नवीन रुग्ण सापडलेला नाही. दादरमध्ये सध्या १७ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून १२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर माहीम मध्ये नऊ लोकांना डिस्चार्ज आणि १६ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस