Join us

मंडईतील गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल *रस्त्यावर केली भाजी विक्रेत्यांची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:54 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने आता जांभळी नाका भागातील भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर भाजी विक्री करण्याची परवानगी दिली आहे. परंतु ही विक्री करीत असतांना रस्त्यावर ज्या पध्दतीने आखणी केली आहे, त्यानुसारच त्याच पध्दतीने भाजी विक्री करावी असे आवाहन पालिकेने केले आहे.

ठाणे : जांभळीनाका भाजी मंडईतील गर्दी काही केल्या कमी होत नसल्याने ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी जांभळी नाका ते स्टेशन परिसरात रस्त्यावर आता भाजी विक्रेत्यांना जागा करुन देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार दुपारपासून भाजी विक्रेत्यांना रस्त्याच्या कडेला जागा करुन देण्यात आली आहे. दोन भाजी विक्रेत्याच्यामध्ये १० फुटांचे अंतर असणार आहे. तसेच भाजी विकत घेण्यास येणाऱ्यांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.           कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचा प्रार्दभाव रोखण्यासाठी देशात आता २१ दिवस लॉक डाऊन घोषीत करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर बुधवारी सकाळीच ठाणे स्टेशन आणि जांभळीनाक्यावरील भाजी मंडईत पुन्हा गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. जे मास्क घालून येते होते. त्यांनाच भाजी दिली जात होती. परंतु आता ही गर्दी टाळण्यासाठी येथील भाजी विक्रेत्यांना जांभळी नाका ते स्टेशन परिसरातील रस्त्यांवर जागा उपलब्ध करुन देण्याचे आदेश आयुक्त सिंघल यांनी दिले आहेत. त्यानुसार संबधीत विभागाने या भागात तशा प्रकारे दोन स्टॉल मधील अंतर, भाजी विकत घेण्यासाठी येणाºया नागरीकांमधील अंतर निश्चित करुन त्यानुसार आखणी केली आहे. दुपार पासून याठिकाणी भाजी विक्री करण्यास सुरवात करण्यात आली आहे. मात्र नागरीकांनी शिस्त बाळगावी असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.यासाठी पालिकेने काही महत्वाचे नियम आखून दिले आहेत. त्यानुसार सर्व भाजीपाला स्टॉल दोन दुकानाच्या दरम्यान किमान १०फुटांचे अंतर निश्तित केले आहे. जे भाजी विक्रेते यासाठी तयार होणार नाहीत. त्यांना कायमचे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व गजबजलेल्या भाजीपाला बाजारपेठा रिकाम्या कराव्यात आणि रस्त्यांवरील जवळच्या भागात तात्पुरते हलविण्यात याव्यात, किराणा व वैद्यकीय दुकाने खुली असतील परंतु कोणत्याही दुकानाचे अंतर ग्राहक आणि दुकानामध्ये १० फूटांपेक्षा कमी नसावे,हे अंतर कमी असेल तर त्याठिकाणी काही वेळा निश्चित केल्या जातील, त्यावेळेतच ती दुकाने सुरु राहतील, तसे दुकानदारांनी देखील तशा खुणा करुन ठेवाव्यात, जे दुकानदार, विक्रेते याचे पालन करणार नाहीत, त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. सर्व आवश्यक सेवा वेळेच्या मर्यादेतच सुरु राहतील, भाजीपाला काढण्यास देखील वेळ मर्यादित असणार आहे. त्यानुसार याचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकाबाजार