दारुच्या दुकानांवर महान व्यक्ती आणि गड-किल्ल्यांची नावं आणतील धोक्यात, न्यायालयीन कारवाईचा पालिकेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 07:56 PM2022-04-06T19:56:07+5:302022-04-06T19:56:22+5:30
नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित दुकाने व आस्थापना मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल
मुंबई - दुकाने आणि आस्थापनांवरील नामफलकावर प्रथमदर्शनी असलेले मराठीतील नाव मोठ्या अक्षरात लिहिणे, हे राज्य सरकारने आवश्यक केले आहे. तसेच मद्यविक्री करणारी दुकाने व मद्य पुरविणाऱ्या आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तिंची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहू नयेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित दुकाने व आस्थापना मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४, दि. १७ मार्च २०२२ अन्वये ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०२२’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अधिनियमाचे कलम ३६ क (१) च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम ७ लागू आहे, त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे आवश्यक केले आहे. बहुतांशी आस्थापनेच्या नामफलकावर देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषा व लिपीतील नामफलकही असते.
मात्र मराठी भाषेतील नाव हे नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मद्य पुरविणाऱ्या व विक्री करणाऱ्या दुकानांच्या नामफलकावर महान व्यक्तिंची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहिता येणार नाहीत, असे पालिकेने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकातून जाहीर केले आहे.