मुंबई : रेल्वे स्थानकाप्रमाणे आता मुंबईतील सार्वजनिक ठिकाणीही मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी वॉटर एटीएम बसविण्यात येणार आहेत. याबाबत इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य अभिरुची प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. वॉटर एटीएममुळे प्लास्टिक बाटलीचा वापर कमी होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाला वाटत आहे.
मुंबईत एटीएम वॉटर मशीन ही संकल्पना राबविण्याची नगरसेविका आशा मराठे यांची ठरावाची सूचना पालिका महासभेत मंजूर करण्यात आली होती. या सूचनेला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार पर्यटन स्थळी, उद्यान, प्राणिसंग्रहालय, मुख्य रुग्णालय केंद्रे या ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी पालिका ‘वॉटर एटीएम’ सुरू करणार आहे.
मुंबईकरांना घराबाहेर पडल्यानंतर स्वच्छ पाणी पिण्यासाठी १५ ते २० रुपये खर्चून एक लीटर बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते. काही रेल्वे स्थानकांवर ‘वॉटर एटीएम’ची सुविधा उपलब्ध आहे. याच धर्तीवर पालिका मुंबईतील विविध गर्दीच्या ठिकाणी वॉटर एटीएम सुरू करणार आहे. यामध्ये गेट वे, गिरगाव, जुहू चौपाटी अशा ठिकाणांसह मुंबईतील उद्याने, मैदाने, मार्केट अशा ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पालिका मुंबईकरांना मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज ३९५८ दशलक्ष लीटर स्वच्छ पाण्याचा पुरवठा करते.हेरिटेज प्याऊच्या दुरुस्तीला वेगमुंबईत अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन हेरिटेज प्याऊ आहेत. या ठिकाणी मुंबईकरांना शुद्ध पाणी मिळते. मात्र यातील अनेक प्याऊ सध्या बंद अवस्थेत आहेत. तर सुरू असणाऱ्या प्याऊच्या ठिकाणी मुंबईकर पाणी पिणे टाळतात. या पार्श्वभूमीवर मुंबईतील ब्रिटिशकालीन प्याऊ दुरुस्ती करून ठिकठिकाणी पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले.