मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी त्यांच्या खार येथील घरात केलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी महापालिकेच्या पथकाला पाहणीदरम्यान सोसायटीमधील इतरही काही रहिवाशांचे अनधिकृत बांधकाम निदर्शनास आले आहे. पथकाने सोमवारी पुन्हा पाहणी केली असून, आता संपूर्ण इमारतीचे ऑडिट केले जाणार आहे.
राणा राहत असलेल्या इमारतीमधील आणखी काही रहिवाशांनी नियमांचे उल्लंघन करत बांधकाम केल्याच्या अनेक तक्रारी मुंबई महानगरपालिकेला प्राप्त झाल्या होत्या. या रहिवाशांनाही पालिकेने नोटिसा बजावल्या. नवनीत राणा आणि रवी राणा यांना महानगरपालिकेने खार येथील घराचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राणा दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, ज्या इमारतीत राणा यांचे घर आहे, त्याच इमारतीबाबत तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. अनेक सदनिकांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिकचे बांधकाम करून नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर महापालिकेने कलम ४८८ अन्वये संबंधित सदनिकाधारकांना नोटिसा बजावल्या होत्या.