मुंबईतील ३३ पदपथांचे महापालिका करणार सुशोभीकरण; ५० कोटी रुपयांचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 08:22 AM2021-10-17T08:22:55+5:302021-10-17T08:23:27+5:30
कुलाबा ते दादर या भागात ३३ पदपथांच्या सुशोभीकरणासाठी ५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबई - महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर असल्याने आता जुन्या पदपथांची दुरुस्ती व सुशोभीकरणाचा बारही उडविण्यात येणार आहे. यासाठी आतापर्यंत ७० कोटी रुपये खर्चाच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तसेच कुलाबा ते दादर या भागात ३३ पदपथांच्या सुशोभीकरणासाठी ५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबईतील अनेक पदपथांवर अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. काही ठिकाणी फेरीवाल्यांनी बस्तान बसवले आहे. तर काही ठिकाणी भिकारी व गर्दुल्यांचे अड्डे असतात. दोन महिन्यांपूर्वी शिवडी, परळ, वरळी, लोअर परेल येथील पदपथाची दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी २६ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
त्यानंतर वांद्रे पूर्व येथील आर.के. रोड व संत ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यालगतच्या पट्टा व पदपथ यांची मास्टिक असफाल्ट व सिमेंट काँक्रीटमध्ये सुधारणा करण्याचा २१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
चेंबूर व माटुंगा येथील पदपथ सुशोभीकरणासाठी ३२ कोटी रुपये खर्च केला जाणार आहेे. वडाळा येथे लेडी जहांगीर मार्ग ते सेेंट जोसेफ चर्च सर्कल, वडाळा रेल्वे स्थानक ते रुईया कॉलेज, चेंबूर येथील महर्षी दयानंद मार्ग, डायमंड गार्डन ते चेंबूर रेल्वे स्थानक यादरम्यान दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. आता दादर, कुलाबा, चर्चगेट, मरीन लाईन्स, वाळकेश्वर या ठिकाणी पदपथ दुरुस्ती केली जाणार आहे.
उतरला पेव्हरचा फिव्हर
दशकभरापूर्वी मुंबईतील पदपथांवर सर्रास पेव्हर ब्लॉक लावले जात होते; मात्र तत्कालीन आयुक्त अजय मेहता यांनी २०१७ मध्ये पेव्हर ब्लॉकवर बंदी घातली. त्यामुळे पेव्हर ब्लॉकच्या जागी आता सिमेंट काँक्रीट किंवा काँक्रिटच्या लाद्या बसविल्या जात आहेत.
यासाठी पदपथांची दुरुस्ती
अनेक भागात पदपथांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी पदपथांवर अतिक्रमण झाले आहे. पदपथांवरील लाद्या आणि सिमेंट काँक्रीट उखडले आहेत. त्यातच खड्डेेे, पाणी साचून राहणे, जलवाहिन्यांची गळती आणि उपयोगिता सेवांचे खणलेले चर यामुळे पदपथांची अवस्था बिकट झाली आहे. परिणामी पादचाऱ्यांची गैरसोय होत असल्याने पदपथांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यावेळेस आवश्यकतेनुसार काही ठिकाणी स्टीलचे रेलिंगदेखील लावले जाणार आहे.