लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर औषध व अन्य साहित्य, सामग्रीचा तुटवडा भासू नये याकरिता मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून दीड लाख रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर उपनगरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दैनंदिन रुग्णसंख्या वाढत आहे. संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून रुग्णांवर उपचारांच्या प्रक्रियेत अडथळा भासू नये याकरिता रेमडेसिवीर इंजेक्शन आणि अन्य औषधोपयोगी साहित्याची खरेदी करण्यात येईल. तसेच, अतिरिक्त ऑक्सिजन सिलिंडर आणि व्हेंटिलेटर्सचीही खरेदी लवकरच करण्यात येणार असल्याचे काकाणी यांनी नमूद केले.
राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, राज्यात झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्त्वाच्या आरोग्य सुविधांवर विशेषत: बेड्स, व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर प्रचंड ताण येऊन त्या सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण हाेऊ शकते. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून अधिक ऑक्सिजनचा साठा उपलब्ध व्हावा, व्हेंटिलेटर्स उपलब्ध व्हावेत आणि खाटांच्या उपलब्धतेसाठी ८०-२० याप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवावा, अशा सूचना जिल्हा, शहर आणि स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण व उपचारातील ‘रेमडेसिवीर इंजेक्शन १००’चे महत्त्व लक्षात घेऊन ‘अन्न व औषध प्रशासना’नेही रुग्णहितासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत रुग्णांना परवडणारी कशी ठरेल याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारनेही यापूर्वी जनहिताच्या दृष्टीने ‘औषध किमती नियंत्रण आदेश २०१३’ अंतर्गत राज्यांनी अधिकाराचा वापर करून किमती नियंत्रित करण्याचे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.