Join us

रुग्णांची डिस्चार्जनंतरही महापालिका घेणार काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 6:34 AM

स्वयंसेवक येणार घरी : नियमित तब्येतीची करणार विचारपूस

शेफाली परब - पंडित।मुंबई : कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही रुग्णांना थकवा आणि अशक्तपणा जाणवत आहे. हे प्रमाण सध्या अत्यल्प असले तरी अशी काही प्रकरणे समोर आल्यानंतर डिस्चार्ज दिलेल्या लोकांच्या प्रकृतीवरही महापालिका लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या साडेसहा हजारांपैकी ७० टक्के रुग्ण ६० वर्षांहून अधिक होते, असे आढळून आले. त्यामुळे महापालिकेचे आरोग्य सेवक, स्वयंसेवक घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजार असलेल्या लोकांच्या प्रकृतीची नियमित विचारपूस करणार आहेत.

मुंबईत आतापर्यंत एक लाख १९ हजार २५५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ९१ हजार ६७३ म्हणजेच ७७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. मात्र यापैकी काही रुग्णांना बरे झाल्यानंतरही अशक्तपणा, थकवा जाणवत आहे. कोरोनामुक्त झालेल्या लोकांना फुप्फुसाचा त्रास जाणवू लागल्यामुळे असे २० रुग्ण महापालिकेच्या परळी येथील के.ई.एम. रुग्णालयात काही दिवसांपूर्वी दाखल झाले होते. कोरोनामुळे आतापर्यंत ६५८८ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये ८० टक्के रुग्ण ५० वर्षांवरील होते, तर निम्मे रुग्ण ६० वर्षांहून अधिक होते.अमेरिकन मेडिकल असोसिएशन जर्नलमध्ये गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार इटलीमध्ये कोरोनामुक्त झालेल्या बहुतांश लोकांना दोन महिन्यांनंतर पुन्हा थकवा आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. मुंबईत अशी परिस्थिती अद्याप तरी नाही, मात्र खबरदारी म्हणून कोरोनामुक्त नागरिकांना नियमित फोन करून त्यांची विचारपूस केली जात आहे. तसेच सरकारी व खासगी रुग्णालयांतून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांमध्ये पुन्हा काही गंभीर लक्षणे दिसून आल्यास त्वरित कळविण्याची सूचना करण्यात आली आहे, असे सूत्रांकडून समजते.ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजीच्मुंबईत रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असली तरी कोरोनामुळे दररोज ३०-४० रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक व हृदयविकार, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार असे गंभीर आजार असलेल्या रुग्णांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने गेल्या दोन महिन्यांत ३६ लाख ५३ हजार घरांना भेटी देऊन सहा लाख तीन हजार ८३४ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली आहे.च्यापैकी २५२७ मध्ये प्राणवायू ९५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने त्यांच्यावर आवश्यकतेनुसार उपचार करण्यात आले. मृत्यूचे प्रमाणही कमी करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.अशी कार्यरत आहे यंत्रणामुंबईतील २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये त्या-त्या विभागातील कोरोना रुग्णांचे वय, त्यांना असलेले इतर गंभीर आजार याबाबत माहिती असते. त्यानुसार कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना फोन केला जातो. तसेच त्यांना परत कोणता त्रास जाणवत आहे का? याची चौकशी केली जाते. याबाबत विचारले असता, बरे झालेल्या रुग्णांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जात असल्याचे जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.कोरोनामुक्त विशेषत: गंभीर आजार असलेल्या लोकांच्या तब्येतीची माहिती नियमित घेण्यास सर्व विभागातील सहायक आयुक्तांना सांगण्यात आले आहे. तसेच काही स्वयंसेवक ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करतील. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक स्वच्छता, पाणीपुरवठा यात काही अडचणी आहेत का? याचीही माहिती घेण्यात येणार आहे.- सुरेश काकाणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस