- अजय परचुरे
मुंबई - दादर स्टेशनला लागून असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडईला बसलेला अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा अखेरीस सुटला आहे. या फेरीवाल्यांवर कारवाई न करणा-या महापालिकेला अखेरीस जाग आली आहे. मंगळवारी पहाटे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने घेतलेल्या विशेष मोहिमेत या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली. 'लोकमत' ने सर्वप्रथम या बातमीला वाचा फोेडली होती. लोकमतच्या सततच्या पाठपुराव्याने क्रांतिसिंह नाना पाटील मंडईतील व्यापाºयांनी या अनधिकृत फेरीवाल्यांविरोेधात सुटकेचा निश्वास टाकला आहे. दादर स्टेशनला लागून असलेल्या कवी केशवसूत उड्डाणपूलाखाली पहाटे ५ ते सकाळी ८ या तीन तासांत हे अनधिकृत फेरीवाले आपला धंदा करत होते. याचा मोठा फटका दादरमधील क्रांतीसिंह नाना पाटील मंडईतील व्यापाºयांना बसत होता. लोकमतने गेले आठवडाभर ह्या बातमीचा पाठपुरावा केला होता. अखेरीस महापालिकेला जाग येऊन पालिकेच्या जी नॉर्थ वॉर्डच्या अतिक्रमण विरोधी विभागाने मंगळवारी भल्या पहाटे या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई केली. महापालिकेच्या जी नॉर्थ वॉर्डचे अतिक्रमण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक रविंद्र भोेसले आणि रमेश कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवाजी पार्क पोलिस स्टेशनच्या मदतीने संयुक्तपणे ही धडक कारवाई करण्यात आली. यात दादर स्टेशनसमोरील सुविधा स्टोर्स पासून क्रांतीसिंह नाना पाटील मंडईपर्यंत अनधिकृतपणे धंदा करणाºया तब्बल १५० फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. या फेरीवाल्यांकडे असलेलं सामानही जप्त करण्यात आलं आहे. यावेळी फेरीवाल्यांनी कोणताही विरोध करू नये म्हणून शिवाजी पार्क पोलिसांचा बंदोबस्त यावेळी करण्यात आला होता. या अनधिकृत फेरीवाल्यांकडून त्यांचं सामान तर पालिकेने जप्त केलंच पण त्याचबरोबर यापुढे या परिसरात अनधिकृतपणे धंदा करण्याची सक्त ताकीदही पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली. उच्च न्यायालयाने रेल्वे स्टेशनपासून १५० मीटरच्या अंतरात कोणत्याही फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव केला आहे. असे असतानाही दादर स्टेशनला लागून हे अनधिकृत फेरीवाले दररोज पहाटे ५ ते सकाळी ८ या तीन तासांत राजरोजपणे धंदा करत होते. याचा मोठा फटका नियमितपणे कर भरणाºया क्रांतिसिंह नाना पाटील मंडईतील व्यापाºयांना बसत होता. ज्यामुळे त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागत होतं. मात्र मंगळवारी झालेल्या कारवाईमुळे मंडईतील व्यापाºयांनाही एकप्रकारे न्याय मिळाला आहे.
महापालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईने आम्हांला निश्चितच आनंद झाला आहे. लोकमतने केलेल्या पाठपुराव्यामुळे पालिकेला जाग आली आणि त्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून योग्य तो धडा शिकवला. त्यामुळे लोकमतचे आम्ही मनापासून आभार मानतो. महापालिकेने आता ही कारवाई करून शांत बसू नये . या अनधिकृत फेरीवाल्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाने सतत या कारवाया करत राहणे गरजेचे आहे. शंकरराव पाटील - भाजी व्यापारी जी नॉर्थ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त खैरनार यांच्या आदेशानुसार आम्ही ही कारवाई मंगळवारी केली. यात आम्ही १५० हून जास्त फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. जवळपास तीन तास ही कारवाई चालली . दादर स्टेशनच्या आसपासचा परिसर आणि क्रांतिसिंह नाना पाटील मंडईच्या परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यात आलं असून पदपथ पूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे. रविंद्र भोसले - वरिष्ठ निरीक्षक,अतिक्रमण विभाग,जी नॉर्थ वॉर्ड .