मालमत्ताकर वसुलीत महापालिकेची मुसंडी, चार महिन्यांत ४०५ कोटी; गेल्या वर्षापेक्षा अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 07:04 AM2021-08-05T07:04:05+5:302021-08-05T07:05:02+5:30
BMC News: कोविड काळात लांबणीवर पडलेली करवाढ आणि २० हजार कोटींच्या थकबाकीमुळे महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराला मोठा फटका बसला. तरीही मार्च २०२१ पर्यंत उत्पन्नाचे लक्ष्य गाठण्यात प्रशासनाला यश आले.
- शेफाली परब-पंडित
मुंबई : कोविड काळात लांबणीवर पडलेली करवाढ आणि २० हजार कोटींच्या थकबाकीमुळे महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराला मोठा फटका बसला. तरीही मार्च २०२१ पर्यंत उत्पन्नाचे लक्ष्य गाठण्यात प्रशासनाला यश आले. ही घोडदौड अद्याप सुरू यंदा एप्रिल ते जुलै या कालावधीत ४०५ कोटी उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही रक्कम अडीशे कोटी अधिक आहे.
कोविड काळात मालमत्ता कर वसुलीवर मोठा परिणाम झाला. मुंबईत दर पाच वर्षांनी मालमत्ता करात वाढ केली जाते. सन २०१५ मध्ये मालमत्ता कर वाढवण्यात आला होता. त्यानंतर २०२० मध्येही करवाढ केली जाणार होती. कोरोमुळे करवाढीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. तसेच करवसुली लांबणीवर पडल्यामुळे डिसेंबर २०२० पर्यंत जेमतेम एक हजार कोटी रुपये उत्पन्न जमा झाले होते.
सन २०२० - २०२१ या आर्थिक वर्षात पाच हजार दोनशे कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले होते. महापालिकेचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्ह दिसू लागताच प्रशासनाने मोठ्या थकबाकीदारांच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केली. मालमत्ता सील करणे, जप्तीची कारवाई सुरू करण्यात आल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले. त्यामुळे मार्च महिन्यात एकाच दिवसात ४१५ कोटी रुपये वसूल करण्यात आले. अखेर मार्च २०२१ पर्यंत मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य पालिकेने गाठले.
यंदा २५० कोटी अधिक
रेडीरेकनरच्या दरानुसार मालमत्ता करात १४ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. मात्र हा प्रस्ताव आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीने फेटाळला. तरीही मागील वर्षीच्या तुलनेत पालिकेने २५० कोटी अधिक उत्पन्न जमा केले आहे. एप्रिल ते जुलै २०२० मध्ये १५५ कोटी मालमत्ता कर वसूल करण्यात आला होता. तर एप्रिल ते जुलै २०२१ या काळात ४०५ कोटी रुपये जमा झाले आहेत.
यामुळे वसुलीत यश
गेल्या वर्षभरात अधिकाधिक कर वसूल करण्यासाठी पालिकेच्या करनिर्धारक व संकलन विभागाने पाठपुरावा केला. यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाली आहे. तसेच मोठ्या थकबाकीदारांवर केलेल्या कारवाईमुळे दोन टक्के दंड टाळण्यासाठी तत्परतेने कर भरला जात असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
अशी झाली होती कारवाई
थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी ११ हजार ६६१ ठिकाणी सील करण्यात आले. तर ४७९ ठिकाणी जलजोडणी खंडित, काही ठिकाणी वाहन व कार्यालयातील वस्तू जप्त करण्यात आल्या. तसेच महापालिकेचे २१० कोटी थकविणाऱ्या ४२ भूखंडांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.
मालमत्ताधारक
चार लाख ५० हजार
निवासी
एक लाख २७ हजार
व्यावसायिक
६७ हजारांपेक्षा अधिक
औद्योगिक
सहा हजार
भूभाग आणि इतर
१२ हजार १५६
वर्ष २०१९-२० चे लक्ष्य पाच हजार ४०० कोटी
वसूल - तीन हजार १५४ कोटी
वर्ष २०२० - २१ चे लक्ष्य ४५०० कोटी
वसूल - ५२०० कोटी