काळ्या यादीतील ठेकेदाराला महापालिकेच्या पायघड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 03:51 AM2018-10-25T03:51:16+5:302018-10-25T03:51:20+5:30

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदारासाठी मुंबई महापालिकेने पायघड्या घातल्या आहेत.

Municipal Corporation's blacklisted contractor | काळ्या यादीतील ठेकेदाराला महापालिकेच्या पायघड्या

काळ्या यादीतील ठेकेदाराला महापालिकेच्या पायघड्या

Next

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदारासाठी मुंबई महापालिकेने पायघड्या घातल्या आहेत. या ठेकेदाराच्या हातात मुंबईतील चौपाट्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे, असा जोरदार हल्ला सर्वपक्षीय सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी चढवला. त्यामुळे चौपाट्यांवर जीवरक्षकांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला आहे. या ठेकेदारावरच पालिका मेहेरबान का? याचा खुलासा प्रशासनाने केल्यानंतर यावर स्थायी समिती निर्णय घेणार आहे.
समुद्रकिनाऱ्यावर जाऊन सेल्फी काढण्यासाठी पर्यटक जीव धोक्यात घालत आहेत. यामुळे चौपाट्यांवर अपघातांची संख्या वाढू लागल्याने येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याची गंभीर दखल घेऊन चौपाट्यांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी गोव्याच्या धर्तीवर खासगी ठेकेदारांकडून सुमारे ९३ तंत्रकुशल जीवरक्षक तैनात केले जाणार आहेत. त्यासाठी पालिका १३ कोटी रुपये खर्च करणार आहे. मात्र यासाठी महापालिकेने निवडलेल्या ठेकेदार कंपनीला एमटीडीसीने बाहेरचा रस्ता दाखवला असल्याचे सदस्यांनी स्थायी समितीच्या निदर्शनास आणले.
राज्य सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदाराला चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी कंत्राट देणे योग्य नाही. या ठेकेदाराने तीन वेगळ्या नावाने निविदा भरल्या असल्याने त्याला कंत्राट देऊ नये, अशी सूचना सदस्यांनी केली. चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी स्थानिक कोळी बांधवांना प्राधान्य देण्यात यावे. मात्र प्रशासन ठेकेदाराच्या पाठीशी असून भूमिपुत्रांना डावलत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केला. मात्र कुठल्याही गुन्ह्याची नोंद नसल्याचे ठेकेदाराने लिहून दिले आहे. त्यामुळे या ठेकेदाराला काम न देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जºहाड यांनी दिली. परंतु सदस्यांनी उत्तरावर आक्षेप घेतल्यामुळे हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला.
>९३ जीवनरक्षक स़ ७ ते दु़ ३, दु़ ४ ते रा़ १२ या वेळेत तैनात असतील
गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा, मनोरी आणि गोराई अशा सातही चौपाट्यांवर दररोज मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी होते. त्या ठिकाणी पालिकेचे ३६ जीवरक्षक दोन पाळ्यांमध्ये तैनात असतात. त्यातील १२ जीवरक्षक कायमस्वरूपी असून इतरांची नेमणूक कंत्राटी स्वरूपात करण्यात आली आहे. गोव्याच्या समुद्रकिनाºयांवर जशी जीवरक्षकांची सुरक्षाव्यवस्था आहे तशीच मुंबईत करण्यात येणार आहे. खासगी कंपनीकडून त्याप्रमाणे तंत्रकुशल जीवरक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यावर १३ कोटी नऊ लाख ७१ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मे. दृष्टी लाइफ सेव्हिंग प्रा. लि.ची तीन वर्षांकरिता निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या चौपाट्यांवर ९३ जीवरक्षक नेमण्यात येणार आहेत. जीवरक्षकांकडे लाइफ जॅकेट, दोरखंड, सेफ्टी ट्यूब, रिंग आदी सुविधा असतील. सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी ४ ते रात्री १२ अशा वेळेत जीवरक्षक चौपाट्यांवर तैनात असतील.

Web Title: Municipal Corporation's blacklisted contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.