कोस्टल रोडसाठी महापालिकेचा आटापिटा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 02:11 AM2019-05-03T02:11:28+5:302019-05-03T02:11:59+5:30
कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला स्थगिती मिळाल्यामुळे पालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत लोकांमध्ये असलेली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाने सुरू केला आहे.
मुंबई : कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला स्थगिती मिळाल्यामुळे पालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत लोकांमध्ये असलेली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाने सुरू केला आहे. या प्रकल्पासाठी भराव टाकल्यानंतर तयार झालेली जागा मोकळीच ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोस्टल रोड प्रकल्पासाठी भराव टाकण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केल्यानंतरही ठेकेदाराची माणसे भराव टाकत असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांनी केला. या प्रकल्पामुळे मच्छीमारांची उपजीविका धोक्यात आल्याचा आरोप होत आहे. या याचिकेवरील सुनावणीत या प्रकल्पाच्या कामाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचा पालिकेचा निर्धार अडचणीत आला आहे.
या प्रकल्पासाठी भराव टाकल्यानंतर निर्माण झालेल्या ९० हेक्टर जागेवरील १५ टक्के जागा मोकळी ठेवण्यात येणार आहे. उर्वरित जागेवर अन्य सुविधांस्वरूपात बांधकाम असेल, असा संदेश सर्वत्र पसरविण्यात येत आहे. मात्र हा गैरसमज असून नागरिकांनी यास भुलू नये, या जागेवर बेस्ट बसगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका, विजेसाठी सब स्टेशन, पोलीस चौकी असणार आहे. उर्वरित जागा मोकळीच असेल, असे स्पष्टीकरण महापालिकेने दिले आहे.