Join us

महापालिकेच्या लाचखोर पर्यवेक्षकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेच्या शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या एका ठेकेदाराचे थकीत बिल मंजूर करण्यासाठी २४ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महापालिकेच्या शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या एका ठेकेदाराचे थकीत बिल मंजूर करण्यासाठी २४ हजाराची लाच घेणाऱ्या शिक्षण विभागातील पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी अटक केली. राजेंद्र नरसिंगराव राजपूत (वय ४८,) असे त्याचे नाव आहे. शिक्षण विभागाच्या करी रोड येथील त्रिवेणी संगम बिल्डिंगच्या कार्यालयात छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईने पालिकेच्या शिक्षण विभागात काहीकाळ खळबळ उडाली.

फिर्यादी ठेकेदार हा २०१० ते २०२० या कालावधीत महापालिकेच्या विविध शाळेत मध्यान जेवण योजनेंतर्गत शालेय पोषण आहार पुरवठा करीत होते. त्यातील काही बिले प्रलंबित असल्याने ते त्याबाबत मिड डे मिल्क विभागात गेले होते. त्यावेळी तेथील भंडारपाल पर्यवेक्षक असलेल्या राजेंद्र राजपूत याने त्यांना तुमच्या खात्यावर यापूर्वी २,३ लाख जमा झालेत, त्याचे १० टक्के कमिशन देण्याची मागणी केली. त्यानंतर उर्वरित बिले मंजूर करण्याचे आश्वासन दिले; मात्र त्याला लाच देण्याची इच्छा नसल्याने मुंबईच्या एसीबीकडे तक्रार दिली. पथकाने रचलेल्या सापळ्यानुसार आज राजपूतच्या कार्यालयात गेले. तो २४ हजार रुपये स्वीकारत असताना त्याला अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्याला पैसे देण्यासाठी पथकाने भारतीय चलनातील ५०० रुपयांच्या २० नोटा तर २८ खेळण्यातील नोटा वापरल्या होत्या.