मुंबई : महापालिका आर्थिक संकटात असल्याचे प्रशासनाने नाकारले तरी काटकसरीचा मोठा फटका मुंबईतील उद्यानांना बसला आहे. मोकळे भूखंड, उद्यानांच्या तरतुदीमध्ये आगामी आर्थिक वर्षात तब्बल ५० टक्के कपात करण्यात आली आहे. विद्यमान आर्थिक वर्षात २५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र सन २०२१- २२ मध्ये केवळ १२६ कोटी रुपये उद्यानांचे सौंदर्यीकरण व देखभालीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. मुंबईतील धकाधकीच्या जीवनात उद्यान, चौपाट्या आदी ठिकाणी मुंबईकरांना विरंगुळ्याचे चार क्षण अनुभवता येतात; मात्र मोकळी भूखंड, उद्यानांची चांगली देखभाल न राखल्यास त्याची दुरवस्था, अतिक्रमण होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे दरवर्षी अर्थसंकल्पातून उद्यानांच्या देखभालीसाठी मोठी तरतूद करण्यात येत होती. त्यानुसार सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात २५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र त्यात सुधारणा करीत ६०.३ कोटी म्हणजे २५ टक्के खर्चात कपात करण्यात आली. यावर्षी भांडवली खर्चाच्या रकमेत पाच हजार कोटींची वाढ करण्यात आली आहे. परंतु, उद्यानांवरील खर्चात ५० टक्के कपात करण्यात आली आहे. तर उर्वरित तरतुदीपैकी बहुतांशी निधी जलतरण तलावांसाठी खर्च करण्यात येणार आहे. तर यावर्षी कोणत्याही नवीन उद्यानाचा विकास केला जाणार नाही; मात्र निधीत कपात केली तरी उद्यानांच्या देखभालीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
या प्रकल्पांसाठी खर्च वरळी, विक्रोळी, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, मालाड आणि दहीसर या ठिकाणी नवीन जलतरण तलाव बांधण्यात येणार आहेत. यासाठी अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परळ येथील नरे पार्क उद्यान, माटुंगा येथील रुस्तमजी तिरंदाज उद्यान, कांदिवली येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे उद्यान, पोईसर येथील प्रमोद नवलकर उद्यान आणि मैदानांचा विकास करण्यात येत आहेत. यासाठी अर्थसंकल्पात ५३.२७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.