पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळेच रुग्णालयाला आग!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 06:47 AM2018-12-18T06:47:33+5:302018-12-18T06:48:01+5:30

आरटीआय कार्यकर्त्याचा आरोप : मुंबईत १० वर्षांत ४८ हजार आगीच्या घटना; अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर

Municipal corporation's fire is due to hospital fire! | पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळेच रुग्णालयाला आग!

पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळेच रुग्णालयाला आग!

Next

मुंबई : पालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याने कामगार रुग्णालयातील आगीत निष्पापांचा बळी गेल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी केला. अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविल्याने मुंबईत २००८ ते १८ या कालावधीत ४८ हजार ४३४ ठिकाणी आग लागल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आणत, शेख यांनी ठोस उपाययोजनांची मागणी केली होती. मात्र, त्याकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने आणखी किती जीव गेल्यावर मनपा प्रशासनाला जाग येणार, असा सवाल शेख यांनी उपस्थित केला आहे.

शेख म्हणाले की, मुंबईत गेल्या १० वर्षांत १ हजार ५६८ उत्तुंग इमारतींमध्ये आग लागून ६०९ लोकांना जीव गमवावा लागला होता. याशिवाय या दुर्घटनांत तब्बल ८९ कोटी रुपयांची वित्त हानी झाली. मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीवरून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. विभागीय अग्निशमन अधिकारी एस. डी. सावंत यांच्या माहितीनुसार, ८ हजार, ७३७ रहिवाशी, तर ३ हजार, ८३३ व्यासायिक इमारतींत गेल्या दहा वर्षांत आग लागली. झोपडपट्टीमध्ये हे प्रमाण ३ हजार १५१ इतके आहे.
मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनियम - २००६ या नियमाची अंमलबजावणी का करत नाही? असा सवालही शेख यांनी उपस्थित केला आहे. आणखी किती दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येणार? असे निवेदनच शेख यांनी मनपा आयुक्त व मुख्य अग्निशमन अधिकारी यांना पाठविल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.

धुरामुळे गुदमरले!

मुंबई : अंधेरी येथे सोमवारी कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, कर्मचारी अडकले. यातील जखमींना कूपर, ट्रॉमा, होली स्पिरीट, सेव्हन हिल्स, हिरानंदानी, सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. बरेच रुग्ण धुरात गुदरमल्याने, भाजल्याने तर काहींनी बचावाकरिता उडी मारल्याने जखमी झाले आहेत.
कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश शिंदे म्हणाले की, कूपर रुग्णालयात भरती रुग्णांना किरकोळ भाजल्याच्या जखमा झाल्या. रुग्णालयातील दोन मृत व्यक्तींनी बचावासाठी उडी मारल्याचे समजते. जखमींवर औषधोपचार सुरू असनू त्यांची प्रकृती सुधारत आहे.
उपनगरीय रुग्णालयांचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रदीप जाधव म्हणाले, आग असो वा अन्य कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, जखमी होणाऱ्यांची कारणे सारखी आढळून येतात. यावरून आपल्याकडील आपत्कालीन स्थितीत प्रतिबंधात्मक योजनांचा अभाव दिसून येतो. या घटनेतील जखमींची कारणेही गुदमरणे, भाजणे अशी आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन असो वा आरोग्य विभागाने याविषयी कृतिशील धोरण तयार केले पाहिजे.

अग्निरोधक यंत्रणा अद्ययावत नाही; कामगार रुग्णालयाची लपवाछपवी

मुंबई : आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या अंधेरी येथील कामगार रुग्णालयाचा गलथान कारभार प्रथमदर्शनी समोर आला आहे. या रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा अद्यायावत नव्हती, तसेच पालिकेने या यंत्रणेबाबत मागविलेली माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे सूत्रांकडून समजते.
मुंबईतील अनेक आगीच्या घटनांत आस्थापनांत वायरिंग बंदिस्त नसणे, अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित, अद्ययावत नसल्याचे दिसून येते. अशा इमारतींना नोटीस बजावूनही कार्यवाही होत नाही. रुग्णालयातील यंत्रणेची माहिती मुंबई पालिकेच्या आपत्कालीन विभागाने मागविली होती. मात्र, वारंवार विचारणा करूनही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. गेली दोन वर्षे रुग्णालय कर्मचाºयांना आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण दिले नव्हेत, असे पालिकेतील सूत्रांकडून समजते.

Web Title: Municipal corporation's fire is due to hospital fire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.