मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या वांद्रे, पाली हिल येथील कार्यालयातील नियमबाह्य बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बुधवारी सकाळी हातोडा चालवला. सुमारे दोन तास चाललेली ही कारवाई, मुंबई उच्च न्यायालयातून स्थगितीचे आदेश आल्यानंतर थांबविण्यात आली. तर कंगनाचे मुंबई विमानतळावर आगमन होताच, तिचे समर्थक आणि विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला.
कंगनाने २०१७ मध्ये पाली हिल येथे तीन हजार चौरस फुटांची जागा खरेदी केली. जानेवारी २०२० मध्ये तिने येथे ‘मणिकर्णिका फिल्म्स प्रा. लि.’ नावाने कार्यालय थाटले. गेले काही दिवस ती वादग्रस्त टिष्ट्वटमुळे चर्चेत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून तिने सातत्याने मुंबई पोलीस आणि शिवसेनेवर टीका केली. मुंबई शहराला ‘पाकव्याप्त काश्मीर’ अशी उपमा देऊन शिवसेनेचा रोष ओढवून घेतला. दरम्यान, एच पश्चिम विभागातील अधिकाऱ्यांनी सोमवारी तिच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली.
कार्यालयातील १४ नियमबाह्य बांधकामांप्रकरणी तिला ‘काम थांबविण्याची’ नोटीस मंगळवारी सकाळी बजावण्यात आली. तिला २४ तासांची मुदत पालिकेने दिली होती. त्या वेळी कंगना मोहालीमध्ये असल्याने तिच्या वकिलांनी उत्तर देण्यासाठी पालिकेकडून सात दिवसांची मुदत मागितली. मात्र कंगनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न आल्याचे कारण देत पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि एच पश्चिम विभागाच्या ४० कर्मचारी-अधिकाऱ्यांनी जेसीबी आणि आवश्यक साधनसामग्रीच्या साहाय्याने पोलीस बंदोबस्तात तळमजला, पहिला मजला आणि कार्यालयाबाहेरील वाढीव बांधकाम जमीनदोस्त केले.
न्यायालयाने दिली स्थगिती
घरमालक उपस्थित नसताना पालिकेने बंगल्यात प्रवेश कसा केला, असा प्रश्न करत उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेकडून पाडकामाबाबत स्पष्टीकरण मागितले. बंगल्यात बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने बजावलेल्या नोटिसीला कंगनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. पालिकेच्या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. या याचिकेवरील सुनावणी एस. जे. काथावाला व न्या. आर. आय. छागला यांच्या खंडपीठापुढे होती.
कंगनाची जीभ घसरली
महापालिकेने केलेल्या पाडकामाच्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या कंगना रनौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत, ‘आज माझे घर तुटले, उद्या तुमचा अहंकार तुटेल. हा काळाचा महिमा आहे, तो बदलत असतो,’ असे म्हणत बॉलीवूड माफिया आणि उद्धव ठाकरे यांचे गुळपीठ यानिमित्ताने उघड झाल्याचा आरोपही केला.
माझ्यापुरता विषय संपला - संजय राऊत
कंगनाप्रकरणी बुधवारी दुपारपर्यंत मौन बाळगणाºया संजय राऊत यांनी त्यानंतर माध्यमांशी बोलताना, ‘मी कधीच कंगनाला धमकावले नव्हते. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्याबद्दलचा माझा राग मी व्यक्त केला होता. आज पालिकेने जी कारवाई केली त्याच्याशी माझा संबंध नाही. माझ्यापुरता हा विषय संपला आहे. मुंबईत कंगनाचे स्वागत आहे, ती येथे राहायला मोकळी आहे,’ असे राऊत स्पष्ट केले. याबाबतची पोस्टही त्यांनी टिष्ट्वटरवर शेअर केली.
दोन वर्षापूर्वीच पाठवली होती नोटीस
कंगना रानौतने खार रोड येथील दि ब्रीझ इमारतीत पाचव्या मजल्यावर असलेल्या घरातही नियमबाह्य बदल केल्याचा आरोप महापालिकेने केला आहे. याप्रकरणी तिला दोन वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने नोटीसही बजावली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने येथील कारवाई लांबणीवर पडली आहे. मात्र स्थगिती उठवल्यानंतर सदर वाढीव बांधकामही तोडण्याची तयारी पालिकेने केली आहे.