Join us

स्वच्छता अभियानाला महापालिकेचा हरताळ

By admin | Published: November 16, 2016 4:55 AM

मुंबईत कचराकुंडीच्या तुटवड्याने केंद्राच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’लाच हरताळ फासला गेला आहे. ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी

मुंबई : मुंबईत कचराकुंडीच्या तुटवड्याने केंद्राच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’लाच हरताळ फासला गेला आहे. ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी पालिकेमार्फत घरोघरी दोन डबे देण्यात येणार होते. मात्र, गेले काही महिने मागणी करूनही डबे मिळत नसल्याने नगरसेवक हैराण आहेत. महापालिकेच्या आगामी निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या महिन्यात लागण्याची चिन्हे आहेत. त्यापूर्वी डबे खरेदी न केल्यास हा प्रस्तावच बारगळण्याची शक्यता आहे. याचा फटका मात्र मुंबईच्या स्वच्छता मोहिमेला बसणार आहे. मुंबईत कचऱ्याचा ढीग वाढतच असल्याने, पालिकेने कचरा पुन:प्रक्रिया प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, ओला व सुका कचरा एकत्रच कचराभूमीवर जात असल्याने, पालिकेच्या अडचणी वाढल्या. त्यामुळे प्रशासनाने ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी नागरिकांना प्रत्येकी दोन डबे पुरवण्याचा निर्णय घेतला. तशी घोषणाही झाली. मात्र, हे डबे नगरसेवकांपर्यंतही पोहोचले नाहीत. बहुतांशी विभाग या डब्यांच्या प्रतीक्षेत आहेत. निवडणुकीच्या काळातच हा तुटवडा निर्माण झाल्याने, नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. स्थायी समितीच्या गेल्या दोन बैठकांमध्ये नगरसेवकांनी याबाबत प्रशासनाला जाब विचारला. मात्र, अद्यापही परिस्थिती जैसे थेच आहे. यामुळे संतप्त नगरसेवकांनी आज प्रशासनाला घेरले. तरीही याबाबत लेखापाल खात्याकडे शहानिशा करण्याचे आश्वासन देत, अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी वेळ मारून नेली. प्रत्यक्षात पुरवठ्याहून मागणी अधिक असल्याने, पुरवठादार कंपनीची क्षमता नाही, असे सूत्रांकडून समजते. (प्रतिनिधी)