Join us  

महापालिकांमध्ये एलईडी!

By admin | Published: March 20, 2015 12:05 AM

एलईडी दिव्यांमुळे ऊर्जा आणि पैशांची बचत होते, असे ठामपणे सांगत एलईडी पथदिवे राज्यातील सर्व महापालिकांमध्ये बसविण्यात येतील,

मुंबई : एलईडी दिव्यांमुळे ऊर्जा आणि पैशांची बचत होते, असे ठामपणे सांगत एलईडी पथदिवे राज्यातील सर्व महापालिकांमध्ये बसविण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. या दिव्यांना असलेल्या शिवसेनेच्या विरोधाला मुख्यमंत्र्यांनी जराही जुमानले नाही.पथदिव्यांच्या कमी प्रकाशामुळे रात्रीच्या वेळी महिलांची छेडछाड, विनयभंग असे प्रकार वाढले असल्याचे पत्र मुंबई परिमंडळ ९च्या पोलीस आयुक्तांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर चांगल्या प्रकाशासाठी एलईडी दिवे बसविण्यासंबंधीची लक्षवेधी सूचना भाजपाचे अमित साटम यांनी मांडली होती. शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता मुंबई महापालिकेतही हे दिवे बसविले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले. एलईडी दिव्यांमुळे विजेची ५० टक्के बचत होते. मुंबईच्या रस्त्यांवरील विजेचे बिल १६३ कोटी रुपये होते. एलईडी दिवे बसविल्याने ते ९३ कोटी रुपये येणार आहे. त्यामुळे ७० कोटी रुपयांची बचत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, एलईडी दिवे लावण्यामागे २ हजार कोटी रुपयांचा ‘व्यवहार’ झाल्याचा आरोप शिवसेनेच्या मुखपत्रात करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी त्याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले, पेपरच्या बातमीवर जाऊ नका. खात्रीशीर माहिती असेल तर माझ्याकडे येत जा. आतापर्यंत कोणालाही ईईसीएलने उपकंत्राट दिलेले नाही. ईईसीएल ही केंद्र सरकारची कंपनी आहे. त्यामुळे पैसा खासगी कंपन्यांकडे जाणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)एलईडी दिवे नकोतच, अशी भूमिका शिवसेनेच्या सदस्यांनी आज विधानसभेत घेतली नाही. या दिव्यांचा टिकावूपणा, त्यांच्या प्रकाशाच्या तीव्रतेबाबत आयआयटी आणि अन्य तज्ज्ञ संस्थांकडून तपासणी झाली पाहिजे, असा आग्रह शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी धरला. यावर, देशातील नामवंत संस्थांनी एलईडी दिव्यांची गुणवत्ता, त्यांच्यामुळे होणारी ऊर्जा व पैशांची बचत यावर शिक्कामोर्तब केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मरिन ड्राइव्हही ओके!मरिन ड्राइव्हवर एलईडी दिवे लावल्याने पूर्वीसारखा स्वच्छ प्रकाश नसतो, असा दावा राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी केला. ‘आपण त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असून काहीही आढळले नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी एलईडीचे समर्थन केले.