- संतोष आंधळे मुंबई : कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या दिव्य परीक्षेतून मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग बाहेर पडत असतानाच गोवरच्या साथीने डोके वर काढले आहे. आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा धावपळ सुरू झाली आहे. विशेष म्हणजे यंदाचा रुग्णाचा वयोगट हा लहान मुलांचा असल्याने अतिकाळजी घेतली जात आहे. कारण लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यांनी जर गोवरच्या आजाराची लस घेतली नसेल तर त्यांना या आजाराचा संसर्ग अधिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्य विभाग ‘गोवर’ परीक्षा पास होण्यासाठी अधिक कष्ट घेताना दिसत आहे. गेल्या तीन वर्षांत मुंबईतील गोवरचा संसर्ग झाल्याची आकडेवारी लक्षात घेतली तर २०२२ मध्ये सर्वात अधिक गोवरचा संसर्ग झाला आहे. २०१९ मध्ये ३७, २०२० मध्ये २९, २०२१ मध्ये दहा बालरुग्ण आढळले होते. दरम्यान, सोमवारपर्यंत १२६ बालकांना या आजाराचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. वर्षअखेरपर्यंत हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातही गेल्या दोन महिन्यांत झालेली रुग्णवाढ लक्षणीय आहे. महापालिकेतील एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात गोवरचे संशयित रुग्ण आढळत आहेत, तेथे आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आहे. बाहेरून काही अधिकची स्वयंसेवकांची कुमक मागवली आहे. प्रत्येक रुग्णांची नोंद ठेवण्याचे काम केले जात आहे. तसेच किती बालकांना गोवरची लस दिलीच नाही याची यादी बनविण्याचे काम सुरू आहे. शिवाजीनगर येथे असणाऱ्या लहान रुग्णालयात या आजाराच्या उपचारासाठी १० बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. मिशन एम पूर्व विभाग सर्वाधिक रुग्ण हे पालिकेच्या एम पूर्व या विभागातून असून, यामध्ये लोटस कॉलनी, गोवंडी, शिवाजीनगर, रफी नगर या परिसराचा समावेश आहे. या विभागात एकूण १५ आरोग्य केंद्र आहेत. नियमितपणे या केंद्रांवर १५ ते २० आरोग्य कर्मचारी असतात. गेल्या काही दिवसांपासून या केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या ४० ते ४५ इतकी झाली आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रावर लसीकरण करणे तसेच परिसरातील लोकांना सध्या पसरत असलेल्या आजाराची माहिती देणे. घरोघरी जाऊन कुणाला ताप किंवा गोवरसदृश लक्षणे आहेत का याची माहिती घेणे तसेच संशयित रुग्ण असेल तर त्यांच्या कुटुंबाना समुपदेशन करणे. त्यांना औषध उपचार घेण्यासाठी केंद्रावर आणणे गरज पडल्यास रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करणे. गोवर या आजारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या अ जीवनसत्वाचे वाटप करणे, अशा स्वरूपाची कामे या विभागात सध्या सुरू आहेत.
शाळांना आणि खासगी डॉक्टरांना पत्रे या परिसरातील सर्व शाळांना पत्र देण्यात आली आहेत. जर एखादा विद्यार्थी ताप आणि पुरळचा आढळून आल्यास त्याला तत्काळ घरी पाठवून द्यावे. तसेच आरोग्य विभागाला याची माहिती देण्यात यावी. त्यामुळे तो राहत असलेल्या आजूबाजूच्या परिस्थितीची पाहणी करण्यास सोपे जाईल. त्याप्रमाणेच खासगी डॉक्टरांच्या संघटनांना पत्र देऊन त्यांना या आजाराबाबत अवगत केले आहे. त्यांनी गोवरसदृश रुग्ण दिसल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळविणे अपेक्षित आहे.