घोटाळेबाज ठेकेदारांवर महापालिकेची मेहेरनजर
By Admin | Published: April 21, 2016 03:07 AM2016-04-21T03:07:33+5:302016-04-21T03:07:33+5:30
गेल्या वर्षी नालेसफाईच्या कामात हातचलाखी करणाऱ्या घोटाळेबाज ठेकेदारांनाच पुन्हा एकदा या कामाचे कंत्राट बक्षीस म्हणून देण्यात आले आहे़
मुंबई : गेल्या वर्षी नालेसफाईच्या कामात हातचलाखी करणाऱ्या घोटाळेबाज ठेकेदारांनाच पुन्हा एकदा या कामाचे कंत्राट बक्षीस म्हणून देण्यात आले आहे़ स्थायी समितीनेही नाल्यांची रुंदी वाढविणे व सफाईच्या तीन प्रस्तावांना मंजुरी देऊन या ठेकेदारांवर मेहेरनजर दाखविली आहे़
गतवर्षी नालेसफाईच्या कामात दीडशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उजेडात आले़ या प्रकरणी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई पालिका प्रशासनाने सुरू केली़ मात्र, ठेकेदारांनी न्यायालयातून स्थगिती आणल्यामुळे प्रशासन तोंडघशी पडले़ आजच्या घडीला हे प्रकरण पोलीस ठाण्यात आहे़ तेथील अहवालानंतरच पुढील कारवाई होऊ शकेल़ या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांना प्रशासनाने घरी बसविले़ मात्र, ठेकेदारांना ६५ कोटी रुपयांचे कंत्राट बहाल करण्यात येत आहे, याचा जाब भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी विचारला़ याच ठेकेदारांना काम द्यायचे होते, तर गेल्या वर्षी चौकशीचे नाटक कशाला केले, असा सवालही त्यांनी केला़ प्रशासन घोटाळेबाज ठेकेदारांची पाठराखण करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे आसिफ झकारिया यांनी केला़ (प्रतिनिधी)
>प्रशासनाची हतबलता
ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली होती़ मात्र, प्रकरण न्यायालयात जाऊन त्यावर स्थगिती आदेश आले़ या प्रकरणाची आता पोलीस चौकशी करीत आहेत़ पोलिसांचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई होईल़ मात्र, पावसाळा तोंडावर असल्याने या ठेकेदारांना कंत्राट देणे हाच एक पर्याय असल्याची हतबलता अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी व्यक्त केली़
भिंत बांधण्याचे काम पावसाळ्यात
नाल्यांची रुंदी वाढवून त्यावर संरक्षक भिंत बांधण्याचे काम करण्यात येणार आहे़ या कामाचाही या कंत्राटामध्ये समावेश आहे़ मात्र, आता ऐन पावसाळ्याच्या वेळेला संरक्षक भिंतीचे काम हाती घेऊन ते पूर्ण करणार कधी, असा सवाल विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा व काँग्रेसचे आसिफ झकारिया यांनी केला़