राणीबागेतील भूखंडावर महापालिकेचा हक्क अबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 03:37 AM2018-11-17T03:37:05+5:302018-11-17T03:37:27+5:30
प्राणिसंग्रहालयाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा : २७ हजार चौरस मीटर जागा मिळणार
मुंबई : मुंबईतील मोक्याचे भूखंड एकापाठोपाठ एक विकासकांच्या घशात जात असताना, सर्वोच्च न्यायालयातून महापालिकेला दिलासा मिळाला आहे. भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय परिसरालगत असणारा २७ हजार २८४ चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर हक्क सांगणारी मे. मफतलाल इंडस्ट्रिज लिमिटेडची याचिका न्यायालयाने रद्द केली आहे. त्यामुळे महापालिकेकडे या भूखंडाचा ताबा राहणार असून, राणीबागेच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात, राणीबागेलगत सुमारे ५४ हजार ५६८.७२ चौरस मीटर आकाराचा भूखंड आहे. हा भूखंड मे. मफतलाल इंडस्ट्रिज लिमिटेड यांना भाडेपट्ट्याने देण्यात आला होता. राज्य शासनाने २००४ मध्ये काढलेल्या अधिसूचनेनुसार भाडेपट्ट्याचा कालावधी २०१७ मध्ये संपल्यानंतर, मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांद्वारे या भूखंडाच्या निम्मा म्हणजेच २७ हजार २८४.३६ चौरस मीटर एवढ्या आकाराचा भूखंड महापालिकेकडे वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या भूखंडावर उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा विस्तार करण्याची महापालिकेची योजना आहे. हा भूखंड ७ जानेवारी, २०१७ रोजी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. मात्र, या हस्तांतरणाविरोधात मफतलाल कंपनीने सर्वोच्च न्यायालयात विनंती याचिका दाखल केली, परंतु तिथेही सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत, ही विनंती याचिका रद्द केली असल्याची माहिती महापालिकेच्या विधि खात्याकडून शुक्रवारी देण्यात आली. गेल्या वर्षभरात महापालिकेच्या हातून तीन मोक्याचे भूखंड निसटले आहेत. जोगेश्वरी, दिंडोशी आणि कांदिवली येथील भूखंड विकासकाच्या घशात गेल्यामुळे, महापालिकेतील विकास नियोजन आणि विधि खात्याकडे संशयाची सुई वळली आहे. अशा वेळी महापालिकेच्या बाजूने लागलेल्या या निकालाने दिलासा दिला
आहे.
असे आहेत नवीन पाहुणे
च्राणीबागेचे १२० कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात येत आहे. सिंगापूरस्थित झिरोंग पार्कच्या धर्तीवर या प्राणिसंग्रलायाचा कायापालट होणार आहे. या प्राणिसंग्रहालयाचा विस्तार सदर भूखंडावर करण्यात येणार आहे. या विस्तारात लांडगा, अस्वल, कोल्हा, मद्रास तलाव कासव, पाणमांजर, तरस, बिबट्या, लहान मांजर संकुल, पक्षी आणि सरपटणारे प्राणी आदींकरता पिंजºयांसाठी प्रदर्शनी निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत.
च्तसेच रात्रीकरिता प्राण्यांसाठी निवासस्थाने, प्राण्यांसाठी कसरतींचे आवार बांधणे, प्राणी पाहण्यासाठी गॅलरी बांधणे, प्रदर्शनी गॅलरीसाठी अॅक्रेलिक ग्लास बसविणे, प्राण्यांसाठी कृत्रिम तलाव, जलाशय बांधणे, पक्षी ठेवण्यासाठी दोरखंडांच्या जाळींचे कुंपण लावण्यात येणार आहे.