Join us  

पालिकेच्या आरोग्य सेविकांचे मानधन 10000 रुपये करावे, नगरसेविका शीतल म्हात्रे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 10:56 PM

मुंबई महानगरपालिकेतर्फे नागरिकांना आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकांचे मानधन रु. ५००० हून रु.१०००० करावे अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी आज पालिका सभागृहात एका हरकतीच्या मुद्याद्वारे केली.

मुंबई- मुंबई महानगरपालिकेतर्फे नागरिकांना आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकांचे मानधन रु. ५००० हून रु.१०००० करावे अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी आज पालिका सभागृहात एका हरकतीच्या मुद्याद्वारे केली. या आरोग्य सेविकांनी आपल्या मानधनात जर पालिका प्रशासनाने वाढ केली नाही, तर येत्या 3 ऑगस्टनंतर त्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सध्या पावसाळा असल्याने लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया, जुलाब आदी साथीचे रोग बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आरोग्य सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी शीतल म्हात्रे यांनी केली.याबाबतीत लोकमतला अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, पालिकेत 4000 आरोग्य सेविका असून त्या 1991 पासून त्या पालिकेच्या सेवेत काम करतात. त्यांचे मानधन 2500 रुपयांवरून 10000 रुपये करावे, अशी शिवसेनेची आग्रही मागणी असताना त्यांचे मानधन तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांच्या कारकिर्दीत 5000 रुपये पालिका प्रशासनाने केले होते. सध्याच्या महागाईत इतक्या कमी मानधनावर उदरनिर्वाह करणे कठीण असून त्यांचे मानधन 10000 रुपये करावे, अशी आग्रही मागणी आपण हरकतीच्या मुद्याद्वारे केली.यावेळी सभागृहनेत्या विशाखा राऊत, माजी महापौर व नगरसेविका स्नेहल आंबेकर, माजी महापौर व नगरसेविका श्रद्धा जाधव, नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी चर्चेत भाग घेऊन या आरोग्य सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवताना येत्या 3 ऑगस्टपूर्वी या आरोग्य सेविकांचे मानधन 10000 रुपये करण्याचे आदेश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले. तर या आरोग्य सेविकांचे मानधन 10000 रुपये करा, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या वतीने शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे या डिसेंबर, २०१७ पासून वारंवार पत्रे व निवेदने देऊन सातत्याने मागणी करून पाठपुरावा केलेला आहे. आरोग्य सेविकांचे मासिक मानधन ५००० हून १०००० करण्याचा प्रस्ताव अनेक महिन्यापासून मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे, अशी माहिती आमदार प्रभू यांनी लोकमतशी बोलताना दिली. नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात आमदार प्रभू यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे हा विषय उपस्थित करून मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या मानधनवाढीच्या प्रस्तावास तात्काळ महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मंजुरी देऊन अंमलबजावणी करावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तांना आदेश द्यावेत अशी मागणी आपण केली असल्याचे आमदार प्रभू यांनी शेवटी सांगितले.