पालिकेची विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:08 AM2021-09-23T04:08:26+5:302021-09-23T04:08:26+5:30
मुंबई – मुंबईतील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी पालिकेने आतापर्यंत विविध घटकांतील लाभार्थींसाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. ...
मुंबई – मुंबईतील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी पालिकेने आतापर्यंत विविध घटकांतील लाभार्थींसाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. त्या धर्तीवर आता पालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात येणार असून, येत्या आठवड्यातील एक दिवस ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
शहर उपनगरात १८ वर्षांवरील तीन लाख विद्यार्थी आहेत. त्यातील निम्म्या विद्यार्थ्यांनी लस घेतल्याची शक्यता आहे. लसीकरणाचा टक्का मात्र तुलनेने कमी आहे. त्यामुळे विशेष मोहीम राबवून हा टक्का वाढवण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करणार आहे. परदेशी जाणाऱ्या २८ हजार ९०३ विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. आठवडाभरात एक दिवस निवडून ही विशेष मोहीम राबविण्यात येईल. या दिवशी फक्त विद्यार्थ्यांचे लसीकरण होईल.
घराजवळील केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आपले महाविद्यालयीन ओळखपत्र दाखवावे लागेल. ज्या विद्यार्थ्यांकडे महाविद्यालयाचे ओळखपत्र नसेल त्या विद्यार्थ्याला आपली विद्यार्थी म्हणून ओळख पटवून देणारे कोणतेही ओळखपत्र दाखवून लस घेता येणार आहे.