महापालिकेच्या पडीक वास्तू येणार वापरात

By admin | Published: October 20, 2015 11:36 PM2015-10-20T23:36:50+5:302015-10-20T23:36:50+5:30

महापालिकेच्या शहरातील ५० हून अधिक वास्तू या गेल्या कित्येक वर्षापासून बांधून तशाच पडून आहेत. केवळ रेडीरेकनरचे दर हे अधिक असल्याने त्या भाड्याने घेण्यासाठी कोणीही

Municipal corporation's vicious architecture will be used | महापालिकेच्या पडीक वास्तू येणार वापरात

महापालिकेच्या पडीक वास्तू येणार वापरात

Next

ठाणे : महापालिकेच्या शहरातील ५० हून अधिक वास्तू या गेल्या कित्येक वर्षापासून बांधून तशाच पडून आहेत. केवळ रेडीरेकनरचे दर हे अधिक असल्याने त्या भाड्याने घेण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. परंतु, आता त्या रेडीरेकनर ऐवजी बाजारभाव मूल्यानुसार उपलब्ध करुन देण्याचे ठाणे महापालिकेने निश्चित केले आहे. त्यानुसार धोरण तयार करण्याच्या कामाला वेग आला असून, महापालिकेला आता रेडीरेक्नरपेक्षा ४० टक्के उत्पन्न कमी मिळणार आहे. परंतु गेल्या कित्येक वर्षापासून पडीक असलेल्या या वास्तू वापरात येणार असल्याने महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.
ठाणे महापालिकेने शहरात विविध स्वरुपाच्या वास्तुू उभारल्या असून त्या सर्व अत्याधुनिक आणि सर्व सोयीयुक्त अशा स्वरुपात आहेत. लोढामधील दुकानांचे गाळे, गडकरी रंगायतमधील काही गाळे, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील कॅटींग, खेवरा सर्कलजवळील मार्केट, वागळे प्रभाग समितीमधील काही दुकाने, हाजुरीमधील मार्केट अशा ५० हून अधिक वास्तू तशाच पडून आहेत. विशेष म्हणजे हाजुरी मार्केट उभारुन आठ वर्षाहून अधिकच काळ लोटला आहे. परंतु, या बंद मार्केटची आज वाईट अवस्था झाली आहे. खिडक्यांच्या काचा तुटलेल्या, पायऱ्यांची बिकट अवस्था, काही ठिकाणचे बांधकाम निकृष्ट झाले आहे. खेवरा सर्कल येथील मार्केट सुद्धा २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी घाईघडबडीत उघडले होते. परंतु, आजही ते बंद अवस्थेत आहे. दरम्यान, आता त्यांचा उपयोग व्हावा आणि त्या वापरात याव्यात, सुस्थितीत राहाव्यात म्हणून पालिकेने हे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार त्या रेडीरेक्नर नुसार नाही तर सध्याच्या बाजारमूल्यावर आधारीत जे दर असतील त्यानुसार देण्याचे पालिकेने निश्चित केले आहे.
शासनाच्या एका परिपत्रकातही कोकण रिजनमध्ये अशा प्रकारे ३० ते ४० टक्के कमी मूल्य मिळाले तरी ते घेऊ शकतात असे सांगण्यात आले आहे. त्याचाच आधार घेऊन आता पालिकेने हा महत्वपूर्ण बदल करण्याचे निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)

रेडीरेक्नरवर आधारीत मुल्यामुळे या वास्तू घेण्यास कोणीही पुढे येत नव्हते. परंतु आता मार्केट व्हॅल्यूनुसार त्या देण्याचे निश्चित झाले आहे. यामुळे पालिकेला ३० ते ४० टक्के उत्पन्न कमी मिळणार असले तरी या पडीक वास्तूंचा वापर सुरु होणार आहे.
-संजय मोरे, महापौर, ठामपा

Web Title: Municipal corporation's vicious architecture will be used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.