नगरपरिषदा निवडणूक हीच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची देणगी- केसरकर
By मनोहर कुंभेजकर | Published: September 1, 2023 01:03 PM2023-09-01T13:03:55+5:302023-09-01T13:30:35+5:30
रणजित चव्हाण यांच्या कार्याबाबत मंत्री दीपक केसरकरांकडून कौतुक
मनोहर कुंभेजकर, मुंबई: गेली ९७ वर्षे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हापरिषद, महानगर पालिकांमधील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी घडवणारी आणि त्यांना प्रशिक्षण देऊन चांगले मनुष्यबळ निर्माण करणारी, वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करणारी आणि त्यांच्या अडचणी शासन दरबारी मांडून सोडवणारी ही देशातील अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेचा वटवृक्ष करणारे या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रणजित चव्हाण यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी काढले.
संस्थेच्या अंधेरी पश्चिम,सी.डी. बर्फीवाला मार्ग,जुहू गल्ली येथील तळमजल्यावर रणजित चव्हाण यांच्या कार्याचा गौरव म्हणून उभारण्यात आलेल्या त्यांच्या दालनाचा लोकार्पण सोहळा आणि संस्थेच्या मेयर हॉल मध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर, एलजीएस,एलएसजीडी,एडीएमएलटी,मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी या विविध अभ्यासक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, रणजित चव्हाण यांचे दालन बघितल्यावर त्यांचे संस्थेबद्धल असलेले समर्पण समजून येते. माझे या संस्थेबरोबर जिव्हाळ्याचे संबंध असून रणजित चव्हाण यांचे कार्य मी नगराध्यक्ष असतांना पासून जवळून पाहिले आहे. १९७६ पासून ते या संस्थेशी निगडित असून वडोदरा शहराचे दोनदा महापौर असतांना त्यांनी या संस्थेत आपला सहभाग ठेवला होता. नगरपरिषदांची निवडणूक ही या संस्थांची देणगी असून
या संस्थेला उज्वल भविष्य आहे.डॉ.जयराज फाटक यांनी रणजित चव्हाण यांचा आदर्श ठेवून संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू ठेवावी असे आवाहन त्यांनी केले.
भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्मार्ट सिटी आणि स्किल डेव्हलपमेंट या ड्रीम योजनांचा फायदा या संस्थेने घेवून राज्याला कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले पाहिजे. तरुणांना जर्मनीत ४ लाख रोजगार उपलब्ध असून, जपान आणि अन्य देशात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहे.त्यामुळे त्यांनी त्या त्या देशातील परदेशी मातृभाषा अवगत केल्यास त्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.
शिंदे-फडणवीस सरकारमुळे मुंबई व महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलत आहे.ट्रान्स हार्बर मुळे मुंबई- रायगड अंतर १५ मिनिटांत पार करून रायगडला मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्याचा फायदा तरुणांनी घ्यावा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रणजित चव्हाण म्हणाले की, १९९६ ते २०१५ पर्यंत संस्थेचा महासंचालक आणि २०१५ पासून आजमितीस संस्थेचा अध्यक्षपदाची धुरा आपण संभाळत आहे.या काळात संस्थेच्या देशातील विभागीय कार्यालयांची संख्या ५२ असून या संस्थेत आतापर्यंत १७ लाख विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे.तर त्यावेळी असलेली ३ कोटी वार्षिक उलाढाल आज ७० कोटींच्या वर नेली असून संस्थेत मी व्यवसायिकता आणली आहे.