Join us

शौचालयांची छोटी-छोटी दुरुस्ती तातडीने होणार, महापालिकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 4:28 AM

सार्वजनिक शौचालयांची कामे जागेअभावी रखडली आहेत. गेल्या दोन वर्षांत निश्चित केलेल्या एकूण सार्वजनिक शौचालयांपैकी ४० टक्के शौचालये महापालिकेने अद्याप बांधलेली नाहीत.

मुंबई - सार्वजनिक शौचालयांची कामे जागेअभावी रखडली आहेत. गेल्या दोन वर्षांत निश्चित केलेल्या एकूण सार्वजनिक शौचालयांपैकी ४० टक्के शौचालये महापालिकेने अद्याप बांधलेली नाहीत. याचा मोठा फटका मुंबई हागणदारीमुक्त करण्याच्या मोहिमेला बसत असल्याने तूर्तास शौचालयांच्या छोट्या छोट्या दुरुस्त्या तातडीने करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईत सार्वजनिक शौचालये बांधण्यात येत आहेत. त्यानुसार आॅक्टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत पाच हजार १३७ शौचालये बांधण्यात येणार होती. या कामासाठी २० ठेकेदार नेमण्यात आले होते. मात्र, दोन वर्षांत २७२० शौचालये ठेकेदारांनी बांधली आहेत, तर नऊ ठेकेदारांनी मुदतवाढ घेतली. जुलै महिन्यात महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील ९३४ शौचालयांपैकी ४२३ शौचालये धोकादायक असल्याचे उजेडात आले. ही शौचालये तत्काळ पाडण्याची गरज आहे.जागेची टंचाई आणि विविध अडचणींमुळे ही कामे रखडली आहेत. तरीही तीन महिन्यांत २४१७ शौचालये बांधण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. यामुळे सर्व २४ विभागांतील सार्वजनिक शौचालयांच्या छोट्या दुरुस्ती कामांसाठी ठेकेदारांची परिमंडळनिहाय नेमणूक करण्यात येणार आहे.या ठेकेदारामार्फत संबंधित परिमंडळांमधील सार्वजनिक शौचालयातील छोटी दुरुस्तीकामे केली जातील. यामध्ये खराब झालेले भांडे बदलविणे, दरवाज्यांच्या खराब झालेल्या कड्या-बिजागऱ्या बदलणे, नळदुरुस्ती, पाइपदुरुस्ती यासारख्या कामांचा समावेश असणार आहे. या कामांवर सहायक आयुक्तांची देखरेख असणार आहे.जुलै महिन्यात झाले आॅडिटमहापालिकेने जुलै महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात ९३४ सार्वजनिक शौचालयांचे आॅडिट करण्यात आले. त्यात ४२३ शौचालये धोकादायक असल्याचे उजेडात आले.१९९७ ते २०१८ या २० वर्षांत १४ हजार ३६९ शौचालये बांधण्यात आली. ही शौचालये झोपडपट्ट्यांमधील नोंदणीकृत संस्थांच्या ताब्यात देण्यात आली.महापालिकेने २०२१ पर्यंत मुंबईत २२ हजार ७७४ शौचालये (शौचकूप) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ही शौचालये दुमजली व तीन मजली असणार आहेत.संपूर्ण २४ विभागांमध्ये शौचालये बांधण्यासाठी महापालिकेला ५३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका