महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू
By admin | Published: March 24, 2015 12:02 AM2015-03-24T00:02:49+5:302015-03-24T00:02:49+5:30
आचारसंहिता लागल्यामुळे महापालिका निवडणुकीसाठीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. प्रचारासाठी फक्त २१ दिवस मिळणार आहेत.
नवी मुंबई : आचारसंहिता लागल्यामुळे महापालिका निवडणुकीसाठीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. प्रचारासाठी फक्त २१ दिवस मिळणार आहेत. यामुळे अनेक उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. राष्ट्रवादी पुन्हा सत्ता मिळविणार की विरोधक त्यांना सत्तेपासून रोखणार हे एक महिन्यात स्पष्ट होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची आचारसंहिता सोमवारी मध्यरात्रीपासून लागू होत आहे. एक महिन्याच्या कालावधीमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ३१ मार्चपासून नामनिर्देशन पत्र देणे व स्वीकारण्याचे काम सुरू होणार आहे.
प्रचारासाठी उमेदवारांना फक्त २१ दिवस मिळणार आहेत. पालिकेच्या दोन दशकांच्या वाटचालीमध्ये यावेळची निवडणूक सर्वाधिक चुरशीची होणार आहे. स्थापनेपासून पालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. परंतु विधानसभा व लोकसभा निवडणुकीमधील पराभवामुळे त्यांच्या लोकप्रियतेला घसरण लागली आहे. पहिल्यांदा त्यांच्यासमोर विरोधकांनी आव्हान उभे केले आहे. पक्षाचे जवळपास ८ नगरसेवक पक्ष सोडून गेले आहेत. अजून काही जण रामराम करण्याच्या मन:स्थितीमध्ये आहेत. यामुळे यावेळी सत्ता टिकविण्यासाठी नाईक परिवारास तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
पहिल्यांदाच त्यांच्यासमोर विरोधकांनी तगडे आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादीने विरोधकांच्या टीकेपेक्षा केलेल्या विकासकामांवर भर दिला असून ते सत्ता टिकविणार की पहिल्यांदाच सत्तेपासून दूर राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
यावेळी निवडणुकीमध्ये शिवसेनेने सत्ताधाऱ्यांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. शिवसेनेमध्ये राष्ट्रवादीमधून ७ व काँगे्रसमधून चार नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. अजून काही नगरसेवक प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विजय चौगुले बंडखोरी करणार होते. परंतु त्यांची बंडखोरी रोखण्यामध्ये पक्षाला यश आले आहे. सद्यस्थितीमध्ये पालकमंत्री व खासदार शिवसेनेचा आहे.
महापालिकेचे माजी आयुक्त व विद्यमान शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्याकडे पालिका निवडणुकीची सूत्रे आहेत. नाहटा यांना सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या कामकाजाविषयी अभ्यास असून त्यांनी नाईकांसमोर आव्हान उभे केले आहे. पालिकेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये भाजपाचा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला होता. परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा पराभव केला आहे. ऐरोलीमध्ये वैभव नाईक यांनीही ४० हजारपेक्षा जास्त मते घेतली होती. यामुळे भाजपा नक्की किती यश मिळविणार यावर सेना व राष्ट्रवादीचेही यश अवलंबून असणार आहे. या व्यतिरिक्त शेकाप, आरपीआय व इतर अनेक छोटे पक्ष त्यांची ताकद आजमाविणार असून एक महिन्यामध्ये कोण किती पाण्यात आहे हे स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)
च्पालिका निवडणुकीसाठी शेकापवगळता कोणत्याच पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. उमेदवार निवडीसाठी फक्त दोन आठवड्यांचा वेळ शिल्लक आहे. अनेक इच्छुकांचे जातवैधता प्रमाणपत्र आलेले नाही. यामुळे सर्वच राजकीय पक्षांना उमेदवार निवडताना कसरत करावी लागणार आहे. शिवसेना व राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारीवरून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. अनेक पक्षांना सर्व प्रभागात उमेदवारही उपलब्ध होण्याची शक्यता नाही. निवडणूक जाहीर झाली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढणार का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्रचारास सहा सुट्यांचा आधार
निवडणुकीदरम्यान तीन रविवार, महावीर जयंती, गुड फ्रायडे व आंबेडकर जयंती अशा सहा सार्वजनिक सुट्या येणार आहेत. या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचता येणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपणार असल्यामुळे अनेक नागरिक गावची यात्रा व लग्नसमारंभासाठी गावी जाणार असल्यामुळे त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे.
मतदार यादीविषयी ९४६ हरकती
महापालिकेने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली असून नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या होत्या. आतापर्यंत ९४६ सूचना व हरकती प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये बेलापूरमध्ये ६६, नेरूळमध्ये २३३, वाशी ८४, तुर्भे २४०, कोपरखैरणेमधून ११७, घणसोलीतून १६६, ऐरोलीतून ३९ व दिघा परिसरातून एक हरकत प्राप्त झाली आहे.